पाण्याची काटकसर करा : अधिकारी, चालक, वाहक सरसावलेगडचिरोली : राज्यातील भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जलजागृती करण्याकरिता ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र’ अभियानात जिल्ह्यात प्रशासनाचे सहकार्य लाभत असतानाच गडचिरोली बस आगारानेही पुढाकार घेतला आहे. चालक, वाहक, अधिकारी यांच्यासह प्रवाशांनीही पुढाकार घेत मंगळवारी बस आगारात आयोजित जलमित्र कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी जलबचतीचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या काही भागात तीव्र आहे. मात्र बहुतांश भागात पाणी मुबलक प्रमाणात आहे. परंतु भविष्यातही मुबलक पाणी राहील, याची शाश्वती नाही. त्यामुळे पाणी मुबलक असतानाही पाण्याचा काटकसरीने वापर व पुनर्वापर करण्याकरिता नागरिकांमध्ये जलजागृती आवश्यक आहे. या हेतूने लोकमतने सुरू केलेल्या जलमित्र अभियानास गडचिरोली आगारात मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी बस आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक सुभाष राठोड यांनी बस आगारात पाणी वापराबाबत व बचतीबाबत महत्त्वपूर्ण बाबी सांगितल्या. पाण्याचा योग्य वापर हीच पाण्याची बचत आहे. बस आगारातील विविध विभागात पाण्याचा काटकसरीने वापर केला जात आहे. याकरिता आगारातील कर्मचारी व अधिकारी लक्ष ठेवून आहेत. पाण्याच्या बचतीसाठी स्वत: पुढाकार घेऊन इतरांनाही पाणी बचतीचे आवाहन आगारामार्फत केले जात असल्याचे राठोड यांनी सांगितले. यावेळी बस आगारातील अधिकारी, चालक, वाहक, कर्मचारी व प्रवाशी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)पाणपोईसाठी एक व्यक्तीपाणपोईच्या ठिकाणी पाण्याचा अपव्यय अधिक प्रमाणात होत असतो. आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी ग्लासमध्ये घेतले जाते व उर्वरित पाणी तसेच फेकून दिले जाते. परंतु आगारामध्ये लावण्यात आलेल्या पाणपोईच्या स्थळी एका खासगी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर व्यक्ती यावर नियंत्रण ठेवतो, त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यास मदत होत आहे. शिवाय प्रवाशांमध्येही पाण्याच्या वापराबाबत जनजागृती केली जात आहे. एकूणच, पाणी बचतीसाठी बस आगारानेही पुढाकार घेतला आहे.
बस आगारात जलबचतीचा मंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2016 1:46 AM