देसाईगंज : तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेले कळमगाव हे केवळ दाेन घराची वस्ती असलेले गाव आहे. मात्र हे गाव मागील काही दिवसापासून गाेवंशाच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध ठरत आहे. विशेष म्हणजे, पाेलीस विभाग या ठिकाणी काेणतीही कारवाई करीत नसल्याने पाेलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. देसाईगंज तालुक्यात माेठ्या प्रमाणात पशुधन आहे. गाेवंशाची तस्करी करणाऱ्या मुख्य व्यापाऱ्याने एजंट नेमले आहेत. हे एजंट कळमगाव परिसरातील गावांमध्ये जाऊन गाेवंश खरेदी करतात. यामागे त्यांना प्रति जनावर काही माेबदला दिला जातो. खरेदी केलेली जनावरे गाेळा करून कळमगाव येथे आणली जातात. काही जनावरे गाेळा झाल्यानंतर ट्रकमधून ही जनावरे छत्तीसगड राज्यात नेली जातात. वाहतुकीदरम्यान काही जनावरे मृत पावल्यास फेकून दिली जातात. तालुका मुख्यालयापासून अवघ्या १२ किमी अंतरावर असताना पाेलिसांनी अजूनपर्यंत या ठिकाणी काेणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पाेलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहेत. मुख्य व्यापाऱ्याचा शाेध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे.
काेट ......
यासंदर्भात अजूनपर्यंत आपल्याला माहिती मिळाली नाही. मात्र याची माहिती काढून संबंधित प्रकरणाचा छडा लावला जाईल.
- जयदत्त भंवर, उपविभागीय पाेलीस अधिकारी, कुरखेडा