चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात कन्नमवार जलाशय असून सुद्धा धरण परिसरातील १४ गावांच्या शेतकऱ्यांना सिंचनाची कोणतीही सोय नसल्याने अनेकदा ओरड होत होती. सिंचाई विभागाच्या वतीने अनेकदा सर्वेक्षण करण्यात आले. धरणाचे पाणी परिसरातील गावांना देणे शक्य नसल्याने अखेर प्रशासनाने जलसंधारण विभागाच्या मार्फत शेतशिवारातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर कोल्हापुरी बंधारे निर्माण करण्याचा प्रकल्प जलसंधारण विभागाच्या मार्फतीने हाती घेण्यात आला. बंधाऱ्यांचे बांधकाम लवकरच पूर्णत्वास येत असल्याने घोट परिसरातील अनेक शेतकऱ्यांना त्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. शेती उपयोगी पाण्याच्या वापराबरोबरच भूमिगत जल पातळीत वाढ होण्यासाठी सदर कोल्हापुरी बंधारे उपयुक्त ठरणार आहेत. कृत्रिम विहीर व बोअरवेलमध्ये मुबलक पाणी उपलब्ध होण्याची सोय होणार आहे. त्यात गुरेढोरे वन्यप्राणी यांनाही या बंधाऱ्याचा लाभ होणार आहे. चापलवाडा, मछली, गांधीनगर, वरुर, माडेआमगाव नाल्याजवळ सुद्धा दर्जेदार साखळी कोल्हापुरी बंधारा बांधण्यात येत आहेत. पाणी साठवण्यासाठी बंधारा परिसरातील नाल्याचे खोलीकरण करण्याची कामेही प्रगतीपथावर आहेत. शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. पाण्याची पातळी वाढ होणार आहे. ३ मे रोजी जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. यु, शेंडे, जलसंधारण अधिकारी सलमान पठाण यांनी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी भेट देऊन बंधाऱ्याची पाहणी केली. गावातील शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक शेतकऱ्यांच्या शंका व तक्रारीचे निराकरण, गैरसमज दूर केले.
काेल्हापुरी बंधारे ठरणार चापलवाडा परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:24 AM