नियमित व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता, स्थायी पशुवैद्यकीय अधिकारी नसणे या बाबींमुळे सदर हत्तीकॅम्प प्रशासकीय अनास्थेचा बळी तर पडणार नाही ना, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान, प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या या भेटीने हत्तीकॅम्पला चांगले दिवस येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हत्तीकॅम्पमध्ये ऑगस्ट महिन्यात ‘सई’ व ‘अर्जुन’ नामक दोन हत्तींच्या पिल्लाचा मृत्यू ओढावला होता. २०२० मध्ये आदित्यचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीत ७ हत्ती शिल्लक आहेत. त्यामुळे हत्तीकॅम्प येथील हत्ती टिकविण्याकरिता वनविभागाकडून काय उपाययोजना करण्यात येईल, याकडे जिल्हावासीयांसह वन्यजीव प्रेमींचे लक्ष लागले आहे.
कमलापूर वनपरिक्षेत्रांतर्गत क्षेत्रात कोलामार्का अभयारण्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोडीसह वनखनिज काढण्याचे प्रमाण वाढल्याने वनसंपत्तीचेही बरेच नुकसान होत आहे. त्यामुळे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत होती.
या भेटीदरम्यान प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी कॅम्पमधील परिस्थितीचा आढावा घेतला. हत्तींची माहिती घेऊन कार्यरत माहूत व चारा कटर यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करीत कॅम्पमध्ये घडलेल्या घटनांची माहिती जाणून घेतली. उर्वरित हत्तींवरील उपचारासंदर्भात आणि पुढील नियोजनाबाबत चर्चा केली, तसेच हत्तीकॅम्प कुठेही हलविण्यात येणार नसल्याचे सांगत, कॅम्प परिसर अधिक सुंदर करून हत्तींची योग्य देखरेख कशी करता येईल, याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. वनसंरक्षण समितीने पुढाकार घेऊन महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशीही सूचना त्यांनी केली.
राज्यातील पर्यटकांना भुरळ घालणारा हा हत्तीकॅम्प पुन्हा नव्याने आपले वैभव प्राप्त करेल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून केली जात आहे.
(बॉक्स)
माहुतांसाठी कर्नाटकातून प्रशिक्षक आणणार
हत्तीकॅम्प परिसरापासून अनेक किमी दूर जाऊन हत्तींना चारा खावा लागत आहे. या परिसरात तलाव असून, पाण्याची सुविधा असल्याने या ठिकाणी बांबू लागवड करून, हत्तींसाठी योग्य चारा तयार करण्याचे नियोजन आहे. हत्तींना निरोगी ठेवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. कॅम्पमधील हत्तींची देखरेख करणाऱ्या माहुतांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी कर्नाटक राज्यातून प्रशिक्षक आणून, या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
060921\1758-img-20210906-wa0238.jpg
कमलापूर हत्ती कॅम्प होणार विकसित