लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरावरून १० किमी अंतरावर असलेल्या करेमरका या गावाकडे जाणाऱ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम केले जात आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटणार आहे.करेमरका गावाजवळून मोठा नाला वाहते. स्वातंत्र्याचे ६० वर्षे संपूनही या नाल्यावर शासनाने पूल बांधला नव्हता. त्यामुळे पावसाळ्यात करेमरका गावाचा संपर्क तुटत होता. काही नागरिक जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करीत होते. नागरिकांनी सातत्त्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने नाल्यावर पुलासाठी निधी मंजूर केला. चार महिन्यांपूर्वी पूल बांधकामाला सुरूवात झाली. मात्र अजुनपर्यंत पुलाचे बांधकाम झाले नाही. पावसाळ्यापूर्वी पूल बांधकाम पूर्ण झाले असते तर नागरिकांचा मार्ग सुकर झाला असता. मात्र केवळ पिलर उभारून झाले आहेत. त्यावर स्लॅबचे काम शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यातही नागरिकांना नाल्याच्या पाण्यातूनच प्रवास करावा लागणार आहे.विद्यार्थ्यांना कडेवर आणतात शिक्षककरेमरका गावापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या ढवळी येथे जिल्हा परिषदेची शाळा नाही. येथील विद्यार्थी शिक्षणासाठी करेमरका गावात येतात. शिक्षक स्वत: पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना स्वत:च्या वाहनावर बसवून शाळेत आणतात व शाळा सुटल्यानंतर गावाला सोडून देतात. सध्या नाल्यात पाणी असल्याने विद्यार्थ्यांना कडेवर घेऊन शिक्षकांना पुढचा प्रवास करावा लागत आहे.
करेमरका गावाचा तुटणार संपर्क पूल अर्धवट : जीव धोक्यात घालून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 10:59 PM