स्वच्छतेचा वसा कायम : लोकसहभागातून गावाने उभारले वैभवगडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील कसारी ग्रामपंचायतीने सन २००७-०८ पासून स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, दारूबंदी, तंटामुक्त आदींसह विविध उपक्रम राबवून अनेक पुरस्कारांचे मानकरी कसारी ग्रामपंचायत ठरली आहे. स्वच्छ भारत मिशन जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले. आज समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी गावातील स्वच्छतेचा वसा कायम ठेवण्याचा निर्धार लोकप्रतिनिधी, कर्मचारी व गावकऱ्यांनी केला. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना तालुका शाखा देसाईगंजच्यावतीने देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत एकूण १९ ग्रामपंचायतीमध्ये ५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत यशस्वीपणे स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आली. आज मंगळवारला कसारी येथे या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंजच्या पं. स. सभापती प्रीती शंभरकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) तथा गडचिरोलीचे बीडीओ फरेंद्र कुत्तीरकर, देसाईगंजचे बीडीओ चंद्रमुनी मोडक, पं. स. सदस्य परसराम टिकले, पं. स. उपसभापती नितीन राऊत, जि. प. सदस्य पल्लवी लाळे, पं. स. सदस्य शांता तितीरमारे, जि. प. सदस्य जयमाला पैंदाम, कसारीचे सरपंच उईके, उपसरपंच विलास बन्सोड, जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्यध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सचिव रोहणकर, जिल्हा सरचिटणीस भांडेकर, कविता साळवे, माया बाळराजे, अमित मानुसमारे आदी उपस्थित होते. कसारी गावात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व गावकऱ्यांच्यावतीने सकाळच्या सुमारास स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर आलेले अधिकारी व लोकप्रतिनिधींनीही प्रत्यक्षात स्वच्छता करून गावकऱ्यांचा उत्साह द्विगुणीत केला. त्यानंतर समारोपीय कार्यक्रमात सर्वच मान्यवरांनी कसारी गावाला आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न कायम ठेवण्यात येतील, असा निर्धार केला. कसारी गावात जैवविविधता व लोकसहभागातून गावकऱ्यांनी गावालगत विविध झाडे असणारी रोपवाटीका उभारली. याशिवाय गावाच्या १ किमी अंतरावर दोन एकर जागेत वनौषधी पार्कची निर्मिती केली आहे. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक सिद्धार्थ मेश्राम, प्रास्ताविक पेशने यांनी केले. यावेळी बहुसंख्य गावकरी उपस्थित होते. जिल्ह्यातील इतर गावांनीही या गावापासून आदर्श घेऊन या गावाने राबविलेले उपक्रम राबवावे, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)
आदर्श गावाकडे कसारीची वाटचाल
By admin | Published: November 18, 2014 10:54 PM