गडचिरोली जिल्हा कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात ही माहिती देण्यात आली. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी.झेड.तुमसरे, मोहीम अधिकारी के.जी. दोनाडकर, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संजय मेश्राम उपस्थित होते.
या बैठकीमध्ये खरीप हंगाम २०२१ च्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यात आली. खते, बियाणे, कीटकनाशके यांची मागणी, पुरवठा, वाहतूक व वाटप यांचे नियोजन करण्यात आले.
(बॉक्स)
कृषी केंद्रांना संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी
जिल्ह्यात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू असली तरी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी जमीन तयार करणे, बियाणे, रासायनिक खतांची पुरेशी साठवणूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने कृषी निविष्ठांची दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कोविड-१९ च्या अटींच्या अधीन राहून सुरू ठेवण्याबाबत परवानगी दिलेली आहे. तसेच शेतकऱ्यांना या वेळेत शेतीच्या कामासाठी जाण्यासाठी मुभा असणार आहे.
(बॉक्स)
भरारी पथके व तक्रार निवारण समित्या
- शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठा मिळण्यासाठी कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके तसेच तक्रार निवारण समित्या स्थापन केल्या आहेत. भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील गुणवत्ता निरीक्षकाकडून बोगस बियाणे व खतांवर विविध टप्प्यांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. वेळप्रसंगी प्राप्त बियाणे व खतांचे नमुने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्या जाणार आहेत.
- अनुदानित रासायनिक खते विक्रीकरिता रासायनिक खते विक्रेत्यांना ई-पॉस मशीन पुरविण्यात आल्या असून, फक्त ई-पॉस मशीनधारक विक्रेत्यांनाच अनुदानित रासायनिक खते विक्रीकरिता येणार आहे. बोगस बियाणे व खतांची विक्री होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली आहे.