गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून जेप्रा, दिभना, अमिर्झा, चांभार्डा, आंबेशिवणी, भिकारमौशी, राजगाटा, उसेगाव आदी गावातील शेकडो नागरिक ये-जा करतात. मार्ग अरूंद असल्याने वाहतुकीस अडथळा होतो.
वृक्षतोडीवर प्रतिबंध घालण्याची मागणी
सिरोंचा : वनविभाग व विविध सामाजिक संघटनेच्यावतीने नागरिकांमध्ये वृक्षतोड न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. परंतु जिल्ह्यातील वनांचे प्रमाण वृक्षतोडीमुळे कमी झाले आहे. परिणामी प्रदूषणात वाढ झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शहरातील नळ जोडणीची तपासणी करा
गडचिरोली : शहरातील अनेक वार्डामध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचल्या जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. मोटार पंप लावल्यामुळे उर्वरित नळांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे मोटार लावणाºयांवर कारवाईची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा
एटापल्ली: अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आदी दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारा एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक रस्त्याच्या मुख्य मार्गावरच उघड्यावर शौचास बसत आहेत.
मामा तलावांमधील अतिक्रमण कायमच
आरमोरी : अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकºयांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गडचिरोली शहरातील गोकुलनगर लगतच्या तलावात अतिक्रमणधारकांनी पक्के घरे बांधली आहेत.
कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात क व्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांचा संपर्क आहे.
दुर्गम भागातील शाळा आवारात जनावरांचा वावर
आलापल्ली : दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षण भिंत उभारण्यात आली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारण्यात आले नाही. परिणामी गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालित आहेत.
भाकरोंडी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
आरमोरी : तालुक्यातील भाकरोंडी परिसरातील अनेक गावातील रस्त्यांचे २० वर्षांपूर्वी बांधकाम करून डांबरीकरण करण्यात आले. परंतु सदर मार्गाची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आवागमन करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता डांबरीकरण पूर्णता उखडले असल्याने खडतर प्रवास करावा लागत आहे.
चातगाव परिसरातील मोबाईलधारक त्रस्त
धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाईलधाकर त्रस्त झाले असून टॉवर दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.