प्रदीप बाेडणे लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : प्राचीन काळातील राज वैभवाची साक्ष देणारा वैरागड येथील किल्ला काळाच्या ओघात ढासळत चालला आहे. काही ठिकाणी तर केवळ अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याची ही स्थिती बघून पर्यटन व अभ्यासासाठी आलेल्या गडप्रेमींना अश्रु अनावर हाेतात. ऐतिहासिक वारसा असलेल्या वैरागड किल्ल्याची सध्या कमालीची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याचे चार बाजुचे बुरूज, तट, झाडाझुडुपांनी वेढले आहेत. शेकडाे वर्षांपासून उन, वारा, पाऊस झेलणाऱ्या तट व बुरूजांची कमालीची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची मागील पाच वर्षांपासून भारतीय पुरातत्व विभागाकडून दुरूस्ती केली जात आहे. त्यामुळे मुख्य दरवाजाची स्थिती चांगली आहे. मात्र किल्ल्याच्या आतील भागातील राजाचा महल, किल्ला परिसरात असलेली चाैकाेनी, पंचकाेनी, अष्टकाेनी व इतर विविध आकाराच्या विहीरी, भूयार व किल्ल्याबाहेर पडण्यासाठी असलेल्या मागच्या दरवाजाची पूर्णपणे पडझड झाली आहे. काही भिंती काेसळल्याने त्यांचे दगड अस्ताव्यस्त परसले आहेत. किल्ल्याची आत्ताची स्थिती बघून गडप्रेमींबराेबरच सामान्य माणसांचेही मन हेलावल्याशिवाय राहत नाही.
बल्हाळशहाचे हाेते राज्यचंद्रपूरचा गाेंड राजा बाबाजी बल्हाळशहा यांनी वैरागडातील हिऱ्यांच्या खाणीच्या संरक्षणार्थ हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर माेगलांनी अनेक स्वाऱ्या केल्या. सेनापती युसूफ खान याने शेवटची स्वारी करून किल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. या लढाईत त्याचे सर्व सैनिक मारल्या गेले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजा बल्हाळशहा याने याच परिसरात मस्जिद बांधली आहे. बाराव्या शतकातील हाथीगुंफा या शिलालेखात वैरागडचा उल्लेख आहे. हिऱ्याला संस्कृतमध्ये वाज्रागर म्हणतात. वाज्रागरच्या अपभ्रंषावरून वैरागड हे नाव पडले.
०५ वर्षांपूर्वी झाली हाेती डागडुजी
२०१५-१६ या वर्षात किल्ल्याच्या साैंदर्यीकरणाच्या कामाला पुरातत्व विभागाने सुरूवात केली. जानेवारी २०२० पासून काम पूर्णपणे बंद पडले आहे. या कालावधीत मुख्य प्रवेशद्वाराची दुरूस्ती झाली. जुन्याप्रमाणेच किल्ला दिसावा, यासाठी जुने दगड व नवीन चुना वापरला आहे.
वैरागड किल्ला व भंडारेश्वर मंदिराच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी निधी खर्च केला जात आहे. या ठिकाणी पुरातत्व विभागाने कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. थांबलेले दुरूस्तीचे काम पुन्हा सुरू हाेणार आहे. के. आर. के. रेड्डी, पुरातत्व अधिकारी
भावी पिढीला जुने वैभव, इतिहास व कलाकृतींची साक्ष पटण्यासाठी किल्ला दुरूस्त हाेणे आवश्यक आहे. केवळ थातुरमातुर दुरूस्त करून ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन करण्याचा केवळ देखावा केला जात असल्याचे दिसून येते.दत्तात्रेय हर्षे, गडप्रेमी, वैरागड