चपराळा येथे मंदिर ट्रस्टचा ठराव : महाशिवरात्री यात्रेत मंदिर परिसरात वाईट व्यसनांना मज्जावचामोर्शी/आष्टी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चपराळा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचे मादकद्रव्य, मादक पदार्थ सेवन अथवा विक्री करण्यास बंदी घालण्याचा ठराव मुक्तिपथ कार्यालय चामोर्शी तसेच कार्तिकस्वामी मंदिर, हनुमान मंदिर ट्रस्ट व चपराळा येथील ग्रामस्थांच्या वतीने रविवारी सभेत घेण्यात आला. चपराळात महाशिवरात्री यात्रेचे पूर्व नियोजन करण्यासंदर्भात कार्तिकस्वामी मंदिरात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात्रा महोत्सवात व्यसनमुक्ती संदर्भात विविध फलक लावले जाणार असून त्याद्वारे नागरिकांना वाईट व्यसन न करण्यासंदर्भात आवाहन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृष्णा रेड्डी यांनी दिली. चपराळा येथील यात्रेत जिल्ह्यासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड येथील भाविक दाखल होतात. यात्रास्थळी स्वच्छता राहावी, याकरिता मंदिर ट्रस्टने पुढाकार घेतला असून भाविकांनाही स्वच्छता पाळण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी मुक्तिपथचे मुलचेरा संघटक सागर गोतपागर, चामोर्शी तालुका प्रेरक विनायक कुनघाडकर, उपसंघटक मुकेश अंबादे, चपराळाचे तलाठी महिंद्रे, पर्यावरण विकास समितीचे कोषाध्यक्ष साईनाथ गुरनुले, हनुमान मंदिराचे अध्यक्ष प्रभाकर पंदिलवार, मंदिर कमिटी सदस्य शंकर पोटे, चपराळा ग्राम पंचायतीचे सचिव व्ही. डब्ल्यू. बारसागडे, पोलीस पाटील मारोती आदे, चौडमपल्लीचे सरपंच शीला तलांडे, आरोग्य सहायक बंडावार, गारसे, पवार, बोढगाडेवार व ग्रामस्थ हजर होते. (तालुका प्रतिनिधी)सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरयात्रेदरम्यान वन व्यवस्थापन समिती चपराळा यांच्याकडून मंदिर परिसरात खर्रा, बिडी तसेच दारू पिणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार असून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावली जाणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांनी कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता यात्रा परिसरात स्वच्छता पाळावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी आरोग्य राखावे, असे आवाहन मुक्तिपथचे तालुका संघटक संदीप वखरे यांनी केले.
खर्रा, अवैैध दारूविक्री व सेवनबंदी
By admin | Published: February 14, 2017 12:51 AM