७०० रूग्ण : गडचिरोली येथील डायलिसिस युनिटगडचिरोली : स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात डायलिसिस युनिट स्थापन करण्यात आले असून या युनिटमधून १० महिन्यात सुमारे ७०० किडणीग्रस्त रूग्णांना जीवदान मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात दवाखान्यांची संख्या कमी असल्याने रूग्णांचा एकमेव भार स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयावर पडतो. स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात डिसेंबर २०१३ मध्ये डायलिसिस युनिट स्थापन करण्यात आले. या युनिटचा लाभ चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व नजीकच्या छत्तीसगड राज्यातील रूग्णांना मिळत आहे. इतर रूग्णालयांमध्ये डायलिसिसची सेवा नसल्याने बहुतांश रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयातच येऊन उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे या युनिटमधून बीपीएलधारक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाते. गडचिरोली येथे डायलिसिसची सुविधा उपलब्ध नसताना रूग्णांना नागपूर, पुणे, मुंबई, यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन उपचार घ्यावा लागत होता. याही रूग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळत असला तरी इतर खर्च सर्वसामान्य रूग्णाला झेपने अशक्य होत होते. त्यामुळे बरेचसे रूग्ण उपचार करण्यापेक्षा घरीच त्रास भोगत राहत होते. गडचिरोली येथे डायलिसिसची सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे रूग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास वाचण्यासही फार मोठी मदत झाली आहे. डायलिसिस युनिटमधून रूग्णाला गरजेनुसार आठवड्यातून तीन ते चार दिवस नियमितपणे डायलिसिस करून घ्यावे लागते. डायलिसिस या उपचारामध्ये रूग्णाच्या रक्ताचे शुद्धीकरण केल्या जाते. डायलिसिस युनिट डिसेंबर २०१३ स्थापन झाले असले तरी प्रत्यक्ष कामाला जानेवारी २०१४ मध्ये सुरूवात झाली. जानेवारी ते आॅक्टोबर या १० महिन्याच्या कालावधीमध्ये ७०० डॉयलेसिंस करण्यात आले आहेत. डायलिसिस युनिटच्या या सेवेकरिता रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. विनोद गेडाम, अधिपरिचारिका (पुरूष) आशिष पिंपळकर, डायलिसिस तंत्रज्ञ अरूणा ठाकरे, स्रेहल जवंजाळकर, करूणा वाघाडे, कक्षसेवक सुरेश धुर्वे, सफाईगार सागर महातव, नंदेश्वर, केशव कोहपरे आदी कर्तव्य बजावित आहे. डॉयलेसिंस युनिटमुळे अनेक किडणी रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या माध्यमातून तत्पर सेवा दिली जात आहे. याचा फायदा दुर्गम व अतिदुर्गम भागातील रूग्णांनाही मिळत आहे. त्यामुळे रूग्णांचे नातेवाईकसुद्धा सेवेवर समाधानी आहेत. (नगर प्रतिनिधी)
किडणीग्रस्तांना जीवदान
By admin | Published: November 04, 2014 10:40 PM