एटापल्ली तालुक्यात फक्त बीएसएनएलची माेबाईल सेवा आहे. तेही तालुक्यातील काही माेजक्याच गावात कव्हरेज मिळते. कव्हरेजची अडचण असली तरी, आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. मग कसे कव्हरेज मिळेल, याकरिता मुले वाट्टेल ती शक्कल लढवतात. एटापल्लीपासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या येमली गावात पाण्याच्या टाकीवर कव्हरेज मिळण्याकरिता बांबू बांधून राऊटर बसविले आहे. ‘लोकमत’चे प्रतिनिधी रविवारी सहज येमली गावात गेले असता, त्यांना अल्पवयीन सहा मुले-मुली चक्क पाण्याच्या टाकीवर चढल्याचे दिसले. यापैकी एक मुलगी व मुलगा पाण्याच्या टाकीच्या सर्वात उंच भागावर चढले होते. लोकमत प्रतिनिधी फोटो घेत असल्याचे लक्षात येताच ते सर्वजण घाईत खाली उतरू लागले. टाकीवर कशाला चढला होता्? असा प्रश्न विचारला असता, सर्व मुले घाबरली. काहीच उत्तर न देता ती लगेच पसार झाली. परंतु हा सर्व प्रकार धक्कादायक होता. ‘लोकमत’ प्रतिनिधीने सर्व प्रकार सरपंच ललीता मडावी यांच्या लक्षात आणून दिला. त्यांनी गावातील काही युवकांनी पाण्याच्या टाकीवर मोबाईल कव्हरेजकरिता बांबू बांधल्याचे सांगितले व उद्यापासून पाण्याच्या टाकीवर लहान मुले चढणार नाहीत, याची दक्षता घेऊ, असे सांगितले.
बाॅक्स
टाकीला संरक्षक भिंतीची गरज
- शहरातील पाण्याच्या टाक्यांना संरक्षक भिंत किंवा काटेरी कुंपण केलेले असते. ग्रामीण भागातील पाण्याच्या टाक्या मात्र माेकळ्याच राहतात. त्यामुळे काेणीही सहज पाण्याच्या टाकीवर चढू शकतो. ग्रामीण भागातील टाक्यांनाही संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे.
- तीन दिवसांपासून एटापल्ली येथे कव्हरेजची समस्या आहे. दिवसातून अनेकवेळा कव्हरेज गूल हाेते. बीएसएनएलने सुविधा सुधारण्याची गरज आहे.