गडचिरोली: गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर सोमवारी २१ ऑक्टोबरला चकमकीत ठार झालेल्या पाच नक्षलवाद्यांची ओळख पटली असून, त्यात दोन जहाल माओवाद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गडचिरोली पोलिसांनी पहिल्यांदाच नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुडमाडमध्ये घुसून ही कारवाई केली, अशी माहिती २२ रोजी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही चकमक गडचिरोली आणि नारायणपूर हद्दीत झाली. या अभियानात सी-६० जवान सहभागी झाले होते. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये कंपनी क्रमांक १० ची विभागीय समिती सदस्य जया ऊर्फ भुरी पादा (३१, रा. उलिया जि. पाखांजूर, छत्तीसगड) आणि पुरवठा विभागाचा समिती सदस्य तसेच वरिष्ठ नक्षल कमांडर सावजी ऊर्फ दसरू तुलावी (६५, रा. गुरेकसा, ता. धानोरा गडचिरोली) या दोन जहाल नेत्यांचा समावेश आहे. उर्वरित देवे ऊर्फ रिता (२५), बसंत आणि सुखमती हे छत्तीसगडमधील होते. यांच्यावर एकूण ३८ लाखांचे बक्षीस होते.
‘सावजी’वर तब्बल ५४ खुनांचे आरोप
चकमकीत ठार झालेला सावजी तुलावी या नक्षल कमांडरवर खून, जाळपोळप्रकरणी तब्बल २२६ गुन्हे दाखल होते. यात खून ५४, चकमक ८४, जाळपोळ ३८ व इतर ५० या गुन्ह्यांचा समावेश आहे. ६५ वर्षीय सावजी हा गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होता. त्याने चळवळीत विविध पदांवर काम केले आहे. सध्या तो कंपनी क्रमांक १० मध्ये पुरवठा विभागात कार्यरत होता. त्याच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते.
आतापर्यंत २४ नक्षल्यांचा खात्मा
या वर्षात आतापर्यंत झालेल्या विविध चकमकीत २४ नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये पोलिसांना आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची मोठी मदत होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांच्या हालचालींवर गडचिरोली पोलिस गेल्या आठवडाभरापासून लक्ष ठेवले होते. पोलिसांनी या भागात अभियानही राबविले होते.