देसाईगंज : किन्हाळा ते फरीदरम्यान गाढवी नदीवर अनेक वर्षांपासून पूल आहे. परंतु, या पुलावर अद्यापही संरक्षक कठडे लावण्यात आले नाहीत. बांधकामापासूनच येथे संरक्षक कठडे नाहीत. सध्या या मार्गावरील रहदारी वाढली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. किन्हाळालगतच्या पुलावर संरक्षक कठडे लावण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्षच केले जात आहे. नदी अथवा पुलाचे बांधकाम करताना अंदाजपत्रकात संरक्षक कठड्यासह अन्य खर्च नमूद असताे. परंतु, या बाबीकडे कंत्राटदार गंभीरतेने लक्ष देत नाहीत. किन्हाळा व अरततोंडी हे गाव पुनर्वसित होण्यापूर्वी मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव, रिठ चिखली, विहीरगाव ह्या गावांचा बैलबंडी व पादचारी मार्ग हा कोकडी गावावरून गाढवी नदी पार करून देसाईगंज या ठिकाणी यावे लागत असे.
गडचिराेलीत वाढली माेकाट कुत्र्यांची संख्या
गडचिराेली : माेकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले असले तरी गडचिराेली नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे माेकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांच्या कळपामुळे गडचिराेलीवासीय त्रस्त आहेत. गडचिराेली शहरात माेकाट जनावरे, कुत्रे व डुकरांची समस्या अतिशय गंभीर आहे. गडचिराेली नगर परिषदेमार्फत अधूनमधून डुकरे पकडण्याची माेहीम राबविली जाते. तरीही डुकरांची संख्या वाढतच चालली आहे. डुकरांच्या समस्येने ग्रस्त नसलेला एकही वाॅर्ड नाही. डुकरांबराेबरच कुत्र्यांचीही संख्या वाढत आहे. रात्री भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेकांची झाेपमाेड हाेत आहे. कुत्र्यांची संख्या वाढत असल्यास त्यांची नसबंदी करण्याचे अधिकार नगर परिषदेला दिले आहेत. मात्र गडचिराेली नगर परिषदेच्या इतिहासात एकदाही नसबंदीची प्रक्रिया राबविली नाही. परिणामी माेकाट कुत्रे वाढत चालले आहेत.
विद्युत खांबांमुळे रहदारीस अडथळा
आष्टी : येथील काही वाॅर्डात अंतर्गत रस्त्यांवर मधाेमध विद्युत खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धाेका बळावला आहे. भविष्यात येथे गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यावरील खांब हटवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गावातील अंतर्गत रस्त्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. दुचाकी व चारचाकी वाहने ये-जा करीत असतात; परंतु मधाेमध असलेल्या खांबांमुळे अडथळा निर्माण हाेत आहे. आधीच येथील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. येथील रस्त्यावरून वाहनांची माेठ्या प्रमाणात रहदारी असते. काही ठिकाणच्या रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे, तर काही ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका बसत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून विद्युत खांब हटवावेत, अशी मागणी आहे.
पातागुडम-काेर्ला मार्गाची दैन्यावस्था कायम
सिराेंचा : तालुक्यातील शेवटच्या टाेकावर व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या पातागुडम परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पातागुडम-काेर्ला या मार्गाची माेठ्या प्रमाणात स्थिती दयनीय आहे. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पातागुडम व काेर्ला ही गावे अतिशय संवेदनशील भागात आहेत. जंगलव्याप्त व नक्षलग्रस्त भागात आधीच हा परिसर अविकसित आहे. त्यातच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रहदारीस अडथळा येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टाेकावरील इंद्रावती नदीच्या टाेकावर पातागुडम हे गाव आहे. पातागुडम-काेर्ला या मार्गावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रस्त्याची दुरुस्ती झाल्यास पातागुडम, रायगुडम, पेंडलाया, साेमनपल्ली, काेप्पेला आदी गावांसह छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी फायदेशीर ठरू शकते. काेर्लासमाेरून देचलीपेठा ते जिमलगट्टा दरम्यान, नाल्यावर पुलाचे बांधकाम झाल्याने देचलीपेठा व काेर्ला तसेच जिमलगट्टामार्गे बारमाही जाेडले आहेत. पातागुडमजवळील इंद्रावती नदीवर पूल बांधल्याने येथून वाहनांची वर्दळ पहावयास मिळते.
आरमाेरी शहरातील वाढीव वस्ती दुर्लक्षित
आरमाेरी : नगरपंचायतीचे नगर परिषदेेमध्ये रूपांतर झाल्यानंतरही आरमाेरी शहरात शहरवासीयांच्या अपेक्षेेप्रमाणे विकासाची गंगा दिसून येत नाही. विकासकामात गती नसून वाढीव वस्ती तसेच शहरापासून दूरवर असलेला परिसर अद्यापही दुर्लक्षित आहे. काळागाेटा परिसरासह वाढीव वस्तीत रस्ते, नाल्या, छाेटे पूल, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर मूलभूत समस्या अजूनही कायम आहेत. नगर परिषद प्रशासनाने शहराचा समताेल विकास साधावा, ज्या ठिकाणी रस्ते, नाल्यांची गरज आहे. शहरवासीयांच्या मागणीनुसार प्रशासनाने विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून हाेत आहे. याकडे मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे द्या
कुरखेडा : तालुक्यातील काही अतिक्रमणधारकांना वनहक्काचे पट्टे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, गावातील इतर अतिक्रमणधारकांना अद्यापही वनहक्क पट्टे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना शासनाच्या या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. या संदर्भात वनहक्क समित्यांकडून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु, अनेक दिवसांचा कालावधी उलटूनही संबंधितांना वनहक्क पट्टे मिळालेले नाहीत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन जमिनीचे पट्टे द्यावेत, अशी मागणी होत आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे.
रस्त्यांवर बांधकाम साहित्य; कारवाई करा
काेरची : शहरातील विविध भागांत घरांचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावरच ठेवले जात आहे. लोखंडी सळाखी तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नगरपंचायतीकडून अशा नागरिकांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्यामुळे बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातही अरुंद रस्ते असतानासुद्धा या ठिकाणी रेती, विटा, गिट्टी आदी साहित्य ठेवले जातात. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार वाढत आहेत.