देसाईगंज/माेहटाेला : किन्हाळा ते फरीदरम्यान गाढवी नदीवर अनेक वर्षांपासून पूल आहे, परंतु या पुलावर अद्यापही संरक्षक कठडे लावण्यात आले नाही. बांधकामापासूनच येथे संरक्षक कठडे नाहीत. सध्या या मार्गावरील रहदारी वाढली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
किन्हाळालगतच्या पुलावर संरक्षक कठडे लावण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नदी अथवा पुलाचे बांधकाम करताना अंदाजपत्रकात संरक्षक कठड्यासह अन्य खर्च नमूद असताे, परंतु या बाबीकडे नागरिक गंभीरतेने लक्ष देत नाही. किन्हाळा व अरततोंडी हे गाव पुनर्वसित होण्यापूर्वी मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव, रिठ चिखली, विहीरगाव या गावांचा बैलबंडी व पादचारी मार्ग हा कोकडी गावावरून गाढवी नदी पार करून देसाईगंज या ठिकाणी यावे लागत असे. कोकडी या ठिकाणी पोहाेचण्यासाठी एक ओढा व नदी ओलांडून जावे लागत असे. त्यामुळे मार्गाची ही अडचण लक्षात घेता, अंदाजे तीस वर्षांपूर्वीच्या तत्कालीन लाेकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने किन्हाळा व फरी या दरम्यान पुलाची निर्मिती झाली. या पुलामुळे कुरखेडापासून देसाईगंज हा कमी अंतराचा सरळ मार्ग तयार झाला. त्यामुळे येथून आता वर्दळ वाढली आहे. रहदारीच्या पुलावर संरक्षक कठडे लावण्याची सोय असतानाही आजतागायत या ठिकाणी संरक्षक कठडे लावले नाही. काही वर्षांपूर्वी एकदा तर धानाचे पोते भरलेला ट्रॅक्टर नदीतच उलटला हाेता. कामाच्या अंदाजपत्रकात या संरक्षक कठडे, नदीचे नाव, पूल निर्मिती दिनांक व कामावर झालेला खर्च आदी लिहिणे आवश्यक असते, परंतु येथील पुलावर अशा प्रकारचा कुठलाही बाेर्ड दिसून येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पुलावर कठडे लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.