महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शहीद जवान किशोर बोबाटे हा स्वगावी चुरमुरा येथे मित्राच्या लग्नासाठी कुटुंबासोबत कुरखेडावरून २ मे रोजी येणार होता. मात्र १ मे रोजीच सदर घटना घडल्याने मित्राच्या लग्नाला यायची इच्छा अपुरीच राहिली.कठीण परिस्थितीवर मात करीत किशोरने पोलीस शिपायाची नोकरी प्राप्त केली. तो कुरखेडा येथे पत्नी व चार वर्षांच्या मुलीसोबत राहत होता. आई-वडील व भाऊ हे स्वगावी चुरमुरा येथे राहत होते. एक ते दोन महिन्यातून हमखास चुरमुरा येथे येऊन आई-वडिलांची भेट घेत होता. गडचिरोली येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या बंदोबस्तासाठी किशोर गडचिरोली येथे आला होता. कुरखेडाकडे जातेवेळी आई-वडिलांची धावती भेट घेतली होती. २ मे रोजी किशोरचा मित्र महेश मेश्राम याचे लग्न होते. या लग्नासाठी किशोर स्वगावी चुरमुरा येथे पत्नी व मुलीसह येणार होता. मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने आई-वडिलांची भेट होते, हा उद्देश होता. मात्र नियतीला हे मंजूर नसावे. त्यामुळे १ मे रोजीच काळाने त्याच्यावर घाला घातला व मित्राच्या लग्नाला येण्याची इच्छा अपुरीच राहिली. मुलगा येणार असल्याने आई-वडिलही सुखावले होते. मात्र घरी पार्थीवच आलेले बघून आई-वडिलांना अश्रू अनावर झाले.गावाचा सुपुत्र शहीद झाल्याचे कळताच गावात शोककळा पसरली. गुरूवारी सकाळपासूनच गावकरी कोणत्याही कामाला न जाता किशोरच्या पार्थिवाची प्रतीक्षा करीत होते. सभोवतालच्या गावातील नागरिकही अंत्यविधीसाठी आले होते. हजारोंच्या उपस्थित किशोरची अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘शहीद वीर जवान किशोर बोबाटे अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी आस्मंत निनादून गेला. सायंकाळी ७ वाजता वैनगंगा नदी घाटावर किशोरच्या पार्थिवावर अंतिम संस्कार झाले.किशोरला एकच चार वर्षांची स्वरा नावाची मुलगी आहे. किशोरच्या निधनामुळे चारवर्षांची स्वरा आता पोरकी झाली आहे. बोबाटे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.पीएसआय बनण्याचे होते स्वप्नखात्यांतर्गत परीक्षा देऊन पीएसआय बनण्याचे किशोरचे स्वप्न होते. यापूर्वी त्याने परीक्षा दिली होती. मात्र थोड्या फरकाने त्याची संधी गेली. पुन्हा तो परीक्षेची तयारी करीतच होता. उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्याची चुरमुरा परिसरात ख्याती होती. विशेष म्हणजे, किशोरला कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते.
मित्राच्या लग्नासाठी किशोर येणार होता स्वगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:37 PM
शहीद जवान किशोर बोबाटे हा स्वगावी चुरमुरा येथे मित्राच्या लग्नासाठी कुटुंबासोबत कुरखेडावरून २ मे रोजी येणार होता. मात्र १ मे रोजीच सदर घटना घडल्याने मित्राच्या लग्नाला यायची इच्छा अपुरीच राहिली.
ठळक मुद्देचार वर्षांची स्वरा झाली पोरकी : हजारोंच्या उपस्थितीत चुरमुरावासीयांनी दिला अखेरचा निरोप