गडचिराेली : बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे उतारवयात प्रामुख्याने हाेणारा आजार म्हणजे गुडघेदुखी हाेय. काेराेना लाॅकडाऊनच्या काळात बरेच नागरिक घरीच राहत हाेते. परिणामी, व्यायाम व हालचाल हाेत नसल्याने गुडघादुखीच्या तक्रारी वाढल्या. मात्र, मार्च ते ऑक्टाेबर महिन्यांत जिल्हा सामान्य रुग्णालयात गुडघादुखीने त्रस्त झालेले रुग्ण काेराेना संसर्गाच्या भीतीने फारसे तपासणीसाठी आले नाही. मात्र, आता रुग्णालयात तपासणीसाठी येणारे गुडघादुखीचे रुग्ण वाढत आहेत.
दरराेजची धावपळ, व्यस्तपणा, काैटुंबिक जबाबदाऱ्या अशी अनेक कारणे पुढे करून सुरुवातीच्या काळात हाेणाऱ्या गुडघेदुखीकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. परस्पर गुडघेदुखीवर घरच्या घरी उपचार करतात. विविध प्रकारची तेलं गुडघेदुखीवर लावली जातात. वेदनाशामक गाेळ्यासुद्धा घेतल्या जातात. तरीही वेदना वाढत गेल्यावर अनेक रुग्ण मग डाॅक्टरांकडे धाव घेतात. ताेपर्यंत खूप उशीर झालेला असताे. दरम्यान, अशावेळी डाॅक्टर रुग्णाला ऑपरेशन करावे लागते, असा सल्ला देतात. विलंबाने हाेणारा महागडा व जटिल उपचार करण्यापेक्षा गुडघादुखीच्या रुग्णांनी सुरुवातीलाच काळजी घेतल्यास फायदा हाेताे.