अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : माणसा-माणसांमध्ये खऱ्याखुºया व जीवापाड प्रेमाचा शोध घेण्याची वेळ अलिकडे आली असताना काही माणसं मात्र मुक्या जनावरांवर अस्सल प्रेम करत असतात. याचा प्रत्यय कोकडी या खेडेगावाला आला आहे. देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथे राहणाऱ्या मोहम्मद जमाल गनी शेख यांनी आपल्या घरी विकत घेऊन आणलेल्या लाडल्या बोंगा ऊर्फ टकली ऊर्फ गनी नावाच्या बैलाला प्रचंड प्रेमाने सांभाळले. तरुणपणात या बैलाने पंचक्रोशीतील अनेक बैलशर्यती गाजवल्या. अखेर या बैलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावरील प्रेमाखातर शेकडो नागरिकांनी अंतिम निरोप देत त्याच्या कर्तुत्वाला सलाम केला. त्याच्या मृत्यूला गुरूवारी (दि.६) पाच वर्ष पूर्ण होत आहेत. कुरूड येथील मंडईच्या निमित्ताने त्याच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.मोहम्मद जमाल गनी शेख यांना शंकरपटाची मोठी हौस. याच हौसेने त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील चिखलगाव येथून वासरू आणले होते. आपल्या मुलाबाळांवर जसे प्रेम करतात अगदी त्याच आपुलकीने, ओढीने, काळजीने शेख हे सदर बोंग्यावर जीव ओवाळून टाकायचे. त्याचे पालनपोषण सुद्धा जणू घरच्या सदस्यांप्रमाणे करीत होते. जंगी इनामी शंकरपटामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या बैलांच्या शर्यतीत नवीन असताना चंद्रपूर जिल्ह्यातील नान्होरी-दीघोरी येथे पट होता. या शर्यतीत बोंगा बैल जखमी झाला. तरीसुद्धा त्याने ती शर्यत जिंकली.आपल्या २५ ते २६ वर्षांच्या आयुष्यात खेळलेल्या सुमारे १५ ते २० शर्यती कधीही न हरता अजिंक्य राहिला. यशाचा लखलखणारा दिवा स्पर्शून अजेय वृत्ती राखणाऱ्या बोंगा बैलाला मेंढा येथे शर्यतीत पराभव स्वीकारावा लागला. हा पराजय बोंगा बैलाच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि चक्क मानवासारखा तो रडू लागला. डोळ्यातून ढळणाऱ्या अश्रूंनी बोंगामधील असलेल्या मानवी संवेदना दिसून आल्या. त्यावेळी तिथे उपस्थित लोकांनी हा मानव आणि बैल यांच्या जीवनातला भावनाशील असा दुर्मिळ प्रसंग आपल्या डोळ्यात साठवला. सदर बैलाने जिंकलेल्या शर्यतीतून टीव्ही, ४ ग्रॅम सोने, दोन कुलर, पंखा आदी साहित्य पारितोषिकाच्या माध्यमातून प्राप्त झाले होते.भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक गावांतील शंकरपटात बोंगा बैलाने सहभाग घेतला. मसली विलम येथे सन २०१४ साली बोंगा आपल्या उभ्या आयुष्यातील शेवटची शर्यत खेळला. देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथे शंकरपटाच्या दिवशीच बोंगा बैलाने या जगाचा निरोप घेतला.त्याच्या कर्तृत्वामुळे बोंगा बैलावर शेकडो लोकांनी प्रेम केले. या प्रेमाच्या ओढीने त्याच्या मृत्यूपश्चात चिखलगाव, जि.चंद्रपूर, नैनपुर, कोकडी येथील शेकडो लोक अंतिम संस्काराला हजर होते. मालक मोहम्मद जमाल गणी शेख यांनी शेकडो लोकांच्या उपस्थितीत मुस्लिम रितीरिवाजानुसार खड्डा खोदून व पूजापाठ करून बैलाला जमिनीत दफन केले.तीन नावांमागे असे होते वैशिष्ट्यआपल्या कर्तृत्वाच्या बळावर सर्वपरिचित असलेला हा बैल दोन दाती पण शिंग नसलेला असल्यामुळे सुरूवातीला तो बोंगा या नावाने ओळखला जाऊ लागला. काही दिवसांत त्याला शिंग आले, पण ते आखूड आणि वक्र असल्यामुळे टकळी हे नाव पडले, तर मालकाचे आडनाव गनी असल्याामुळे गनी अशा तीन नावांनी तो ओळखला गेला.
हारल्यानंतर अश्रू ढाळणारा कोकडीचा ‘बोंगा’ बैल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 6:00 AM
देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथे राहणाऱ्या मोहम्मद जमाल गनी शेख यांनी आपल्या घरी विकत घेऊन आणलेल्या लाडल्या बोंगा ऊर्फ टकली ऊर्फ गनी नावाच्या बैलाला प्रचंड प्रेमाने सांभाळले. तरुणपणात या बैलाने पंचक्रोशीतील अनेक बैलशर्यती गाजवल्या. अखेर या बैलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावरील प्रेमाखातर शेकडो नागरिकांनी अंतिम निरोप देत त्याच्या कर्तुत्वाला सलाम केला. त्याच्या मृत्यूला गुरूवारी (दि.६) पाच वर्ष पूर्ण होत आहेत. कुरूड येथील मंडईच्या निमित्ताने त्याच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
ठळक मुद्देशेकडोंच्या उपस्थितीत झाला होता दफनविधी : मोहम्मद जमाल गनी शेख यांचे बैलावरील अनोखे प्रेम