शाळा समितीचा पुढाकार : वर्गखोल्या बांधकामाच्या मुद्यावर ग्रामस्थ आक्रमक कोरची : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कोचीनारा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील दोन वर्गखोल्या जुन्या व कौलारू पध्दतीच्या असून त्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या शाळेत नव्याने दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शाळा समितीच्या पदाधिकारी व पालकांनी गट शिक्षणाधिकारी निवेदनाद्वारे केली होती. मात्र या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कोचीनारा जि.प. शाळेला चक्क कुलूप ठोकले. या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ७ डिसेंबर रोजी गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. यात त्यांनी म्हटले होते की, मागील पावसाळ्यात व पुढील काळातही सदर दोन्ही वर्गखोल्यांमध्ये वर्ग भरविण्यास शाळा व्यवस्थापन समितीने मनाई केली आहे. सदर वर्गखोल्याचे बांधकाम करण्यासाठी कागदपत्राची पूर्तता शाळेमार्फत करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही बांधकामाबाबत कार्यवाही करण्यात आली नाही. २४ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली. २ जानेवारी २०१७ पर्यंत बांधकाम मंजुरीविषयी कार्यवाही न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा दिला होता.
कोचीनारा शाळेला कुलूप ठोकले
By admin | Published: January 03, 2017 12:51 AM