अहेरी : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची दुरवस्था आहे.
वाहतूक समस्या गंभीर
भामरागड : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बस थांबा पासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली, तरी भामरागड येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. खासगी वाहनांमुळे एसटीला प्रवासी मिळणे कठीण झाले आहे.
चपराळा पर्यटनस्थळी सुविधांचा अभाव
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम, चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र याठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प थंडबस्त्यात
अहेरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात.
इमारती लगतच्या रोहित्रांचा धोका वाढला
गडचिरोली : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकांचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाजारात ओटे बनवा
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी हे परिसरातील मोठे गाव असून, येथे दर शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. परिसरातील शेकडो नागरिक वस्तूच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात येतात. मात्र या बाजारात ओट्यांची व्यवस्था नसल्याने विक्रेत्यांसह ग्राहकांना त्रास होत आहे. त्यामुळे ओटे बांधावेत.
डेपो अभावी नागरिक त्रस्त
कुरखेडा : अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावात निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र कुरखेडा येथे निस्तार डेपो नाही.
विहिरीवर खासगी पंप
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक शासकीय विहिरीवर खासगी पाणी पंप लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाहीत. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यावे.
कव्हरेजची समस्या
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात माेबाईल टाॅवर नसल्याने कव्हरेजची समस्या आहे. लाेकांकडे असलेले ॲन्ड्राॅईड माेबाईल इंटरनेटवरील कामाशिवाय कुचकामी ठरत आहे. त्यामुळे गुड्डीगुडम येथे टाॅवरची निर्मिती करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे.
एटापल्लीत अतिक्रमण
एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढावे, अशी मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष आहे.
मुख्यालय सक्तीचे करा
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहत नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहत नाहीत. अनेक कामे खाेळंबतात.
माेहझरीत रस्ते खड्डेमय
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. हे रस्ते दुरूस्त करावेत त्याचबरोबर नाल्या साफ कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे. त्यामुळे रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.
स्वच्छतेचा पडला विसर
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक कार्यालयात पसरलेल्या घाणीमुळे शासकीय कार्यालयातील स्वच्छता पाळण्याच्या प्रयत्नाला हरताळ फासला आहे. अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली असल्याने याठिकाणी बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
खाऊचा दर्जा खालावला
अहेरी : अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविला जातो. मात्र, मागील काही दिवसापासून या शालेय पोषण आहाराचा दर्जा घसरत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थी सदर पोषण आहार खात नाही. परिणामी, पोषण आहार बाहेर फेकून द्यावा लागतो. आहाराच्या दर्जाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.
दवाखान्याची दुरवस्था
भामरागड : तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारती अभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी हाेत आहे.
भूमिअभिलेखाची पदे रिक्त
एटापल्ली : उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात १७ मंजूर पदांपैकी केवळ आठ पदे भरलेली आहे. मुख्य उप अधीक्षकाचे पद रिक्त असून सिरोंचा येथील अधिकाऱ्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना एटापल्ली व सिरोंचा अशा दोन ठिकाणचा पदभार चालविणे कठीण झाले आहे.