नऊ किलोमीटरच्या घाटाच्या सुरवातीपासूनच्या वळणावरुन तर घाट संपल्यावरही समोर खड्डे पडले आहेत. जवळपास १४ किलोमीटर बेडगाव पासूनतर पुराडापर्यंत असे अनेक जीवघेणे खड्डे या राष्ट्रीय महामार्गावर पडले आहेत. मागील वर्षीच या रोडचे डांबरीकरण झाले. जेव्हा डांबरीकरणाचे काम सुरू होते त्या दिवशी खूप पाऊस येत होता. तरीही कंत्राटदाराने काम सुरू ठेवले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वर्ष पूर्ण होण्याआधीच रस्त्यावरचे डांबर उखडून खड्डे पडले आहे. तसेच खड्डे बुजवण्याचे व डागडुजीचे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मात्र ज्या ज्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचे डागडुजी काम झाले नेमके त्याच ठिकाणी या पावसाळ्यात तलावासारखे मोठमोठे खड्डे पडले आहे.
छत्तीसगड राज्यावरून रायपूर-राजनांदगाववरून कोरची मार्गे कुरखेडा-गडचिरोली-चंद्रपूरकडे रात्रंदिवस अनेक अवजड वाहनांची वर्दळ राहते. या राष्ट्रीय मार्गावर करोडो रुपयांची रस्त्याची कामे कंत्राटदाराकडून व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते मात्र कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केल्याचे प्रवासी नागरिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळेच लवकरच या महामार्गावर पुन्हा खड्डे पडत आहेत. अशी नागरिकांमध्ये सतत चर्चा सुरू राहते तसेच या मार्गावरील खड्ड्यामुळे प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचे अपघात होऊन त्यांचे मृत्यू झाले आहे. याला जबाबदार असणाऱ्या सदर काम करणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हाेत आहे.
बाॅक्स :
अनेकदा घडले अपघात
या नऊ किलोमीटरच्या घाटावर अपघात झाले तर वाहन सरळ दरीत कोसळल्याशिवाय राहत नाही आणि कोसळले तर माणूस जिवंत राहण्याची किंवा वाचण्याची शक्यताच नसते. तशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी घडली. चंद्रपूरवरून कोरचीला बदली झालेल्या एका पोस्टमास्तर कर्मचाऱ्याला कोरचीत सोडून परत चंद्रपूरला निघालेले चारचाकी वाहन कार परतीच्यावेळी याच घाटावरील दरीत कोसळले आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीची प्रकृती गंभीर होती. असे अनेक अपघात या घाटावर व या मार्गावर घडले आहेत. कित्येक ट्रकही या खड्ड्यांमुळे उलटले आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवास आता वाहनचालकांना त्रासदायक व जीवघेणा बनला आहे.
बाॅक्स :
कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
दरवर्षी या महामार्गाची अनेकदा डागडुजी केली जाते मात्र डागडुजीनंतरही अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था हाेते. पुन्हा या महामार्गाला तलावाचे स्वरूप प्राप्त हाेत. मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे नागरिक या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. या महामार्गावरील पडलेल्या खड्ड्याची पुन्हा डागडुजी न करता या महामार्गावरील रस्त्याचे काम नव्याने व उच्च दर्जाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.