गडचिराेली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या कोरची नगरपंचायतीने २०२२-२३ या वर्षात ९६ टक्के कर वसुली करीत नगरपंचायत गटात राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला. त्याबद्दल नगर विकास दिनाचे औचित्य साधून मुंबई येथे २० एप्रिल राेजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन न.पं. पदाधिकाऱ्यांचा गाैरव करण्यात आला.
मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी तसेच पदाधिकारी उपस्थित हाेते. काेरची नगर पंचायतच्या वसुली पथकाचे नेतृत्व कर अधीक्षक बाबासो हाक्के यांनी केले या पथकात कर लिपीक रवींद्र मडावी, लेखापाल सुदीप ढोले, लिपीक जयपाल मोहुर्ले, नरेंद्र कोतकोंडावार, विजय जेंगठे, अनिता येरमे, आशिष रघोर्ते, सागर बनपूरकर आदी सदस्यांचा समावेश हाेता.पथकाचे प्रयत्न फळाला
वसुलीसाठी प्रत्येक नागरिकांच्या घरी वारंवार जाऊन त्यांना कर भरणा करण्यास सांगावे लागत हाेते. सांगूनही कर न भरणाऱ्या कर थकीत ठेवणाऱ्या नागरिकांच्या मालमत्ता सिल कराव्या लागत हाेत्या. उन्हाळ्याचे दिवस असतानाही सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण शहरात पथक फिरत हाेते. अनेकदा तर सुट्टीच्या दिवशीही काम करून या पथकाने कर वसुली केली. पथकाचे हेच प्रयत्न फळाला आले, असे बाबासाे हाक्के यांनी सांगितले.