लिकेश अंबादे
कोरची (गडचिरोली) : अनेक प्रकारची औषधी गुणधर्म असलेली जांभळं सध्या सर्वत्र विकायला आली आहेत. यात गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील जांभळं सर्वांच्या खास पसंतीस पडत आहेत. ही जांभळं नागपूर, चंद्रपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांत विकण्यासाठी जातात. या चविष्ट आणि टपोऱ्या जांभळांची ख्याती आता विदर्भात बहुतांश भागांत पोहोचली आहे. त्यामुळे कोरचीची जांभळं म्हटले की ग्राहकही त्या जांभळांना पहिली पसंती देत आहेत.
मध्य प्रदेशातील मंडला, छत्तीसगडमधील पाखांजूर, तसेच ओरिसातूनही विदर्भात जांभळं विक्रीसाठी येतात; पण त्या जांभळांपेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील कोरचीच्या जांभळांना लोकांची अधिक पसंती मिळत असल्याने त्यांची मागणी वाढली आहे. या भागाला विशेष ओळख देणाऱ्या या जांभळांमुळे सध्या तालुक्यातील बहुतांश लोकांना हंगामी रोजगारही मिळाला आहे.
पूर्वी ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी जांभळांचे संकलन करून ते डोक्यावर टोपलीत घेऊन किंवा सायकलवर मांडून कोरची, कुरखेडा भागात विकायला आणायचे; परंतु मागणी वाढल्याने स्थानिक व्यापारी आणि मोठ्या शहरातील व्यापारी ज्या ठिकाणी जांभळांची झाडे आहेत त्या ठिकाणी जाऊन झाडांची (त्यावरील जांभळांची) खरेदी करायला लागले आहेत. एका मोठ्या जांभळाच्या झाडातून किमान आठ ते नऊ कॅरेट जांभळं निघतात.
नागपूरच्या बाजारपेठेमुळे दुप्पट किंमत
गेल्यावर्षी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोरची तालुक्यातील जांभळांना थेट विक्रीसाठी नागपूर येथील मुख्य बाजारपेठेत नेण्यास सुरुवात झाली. यामुळे कोरचीच्या जांभळांना दुप्पट किंमत मिळू लागली. महिला बचत गटाकडूनही जांभळांची खरेदी करून थेट नागपूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेली जात आहे.
तीन प्रकारची जांभळं आणि त्यांची वैशिष्ट्ये
कोरची तालुक्यात निघणारी जांभळं तीन प्रकारची असून, त्यामधील पहिला प्रकार म्हणजे जांभूळ लहान, गोल स्वरूपाचे आणि चवीला तुरट असते. या जांभळाची झाडे नदी-नाल्याशेजारी असतात. ही जांभळं सुरुवातीच्या तुरळक पावसामध्ये पिकून जातात. दुसरी जांभळं मध्यम स्वरूपाची असून, लांबट आकाराची व चवीला खूप गोड असतात. या जांभळाची झाडे बहुतेक ठिकाणी आढळतात. तिसऱ्या प्रकारातील जांभळं आधीच्या दोन्ही जांभळांपेक्षा आकाराने मोठी आणि झाडावरून तोडल्यानंतर दोन दिवसांत अधिक गोडीवर येणारी असतात. त्यामुळे या जांभळांना लोकांची सर्वाधिक पसंती असते. कोरची तालुक्यात तिन्ही प्रकारातील मिळून जांभळांची अंदाजे तीन ते साडेतीन हजार झाडे आहेत.
जांभूळ गुणकारी
जांभूळ हे विशेषत: गोड-तुरट चवीची असतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. जांभळाला सायझिजियम क्युमिनी असे शास्त्रीय नाव आहे. जांभूळ मधुमेह रोगावर गुणकारी आहे. जांभूळ रसाच्या तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर औषध आहे. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरचे मुरुम व पुटकुळ्या जांभळाच्या बिया उगारून लेप लावल्यास नष्ट होतात. जांभूळ हे पाचक आहे, असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. रामायण व पौराणिक ग्रंथामध्येही जांभळाचे महत्त्व विशद केले आहे. एकूणच जांभूळ हा आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.