कोर्ला गावात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याचा अभाव आहे. सिरोंचा तालुका मुख्यालायापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात जाण्यासाठी नदी-नाले व डोंगरदऱ्यातून वाट काढावी लागते. गावातील रुग्ण अथवा गरोदर स्त्रियांना वेळीच रुग्णालयात उपचारासाठी भरती करताना अनेक अडचणी येतात. उपचाराअभावी अनेक रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांना अद्यापही डोंगरदऱ्या व नाल्यांमधून वाट काढावी लागत आहे. परिणामी, अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. आजारी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी वेळीच वाहतुकीची सोय उपलब्ध होत नसल्याने अनेकदा बैलगाडीचा आधार घ्यावा लागतो. अनेक किलोमीटरची पायपीट करून रुग्णांना उपचाराकरिता न्यावे लागते. गावात येण्यासाठी पक्क्या रस्त्याचा अभाव असल्याने येथे बससेवेचा अभाव आहे. तालुक्याच्या दुर्गम भागातील बऱ्याच गावांमध्ये पक्के रस्ते व नाल्यांचा अभाव आहे.
कोर्ला परिसर मूलभूत सुविधांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:35 AM