राज्यपालांचे आश्वासन : लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलेगडचिरोली : तालुक्यातील कोटगल बॅरेजला निधी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन राज्यपालांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दिल्यानंतर या बॅरेजचे काम मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोटगल बॅरेजला राज्य शासनाने १० वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. मात्र या प्रकल्पावर शासनाने निधीची तरतूद न केल्याने ते व्यपगत होण्याच्या मार्गावर होते. याबाबत आ. डॉ. देवराव होळी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. तरीही या प्रकल्पासाठी निधी मिळणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. कोटगल बॅरेज सिंचन प्रकल्पासाठी अग्रीम निधी मंजूर न केल्यास अधिवेशनातच १६ मार्च रोजी विधानसभेच्या पायऱ्यांवरच आपण उपोषणाला बसू, असा इशारा आ. डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिलेल्या निवेदनातून दिला होता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांची भेट घेऊन मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खा. अशोक नेते, आ. क्रिष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी, भाजपा नेते डॉ. भारत खटी, रवींद्र ओल्लालवार यांनी राज्यपालांची भेट घेतली व बॅरेजकरिता निधी देण्याची मागणी केली. राज्यपालांनी या बॅरेजकरिता निधी देण्याचे आश्वासन दिले. यामुळे राज्य शासनाकडून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (नगर प्रतिनिधी)
कोटगल बॅरेजला मिळणार निधी
By admin | Published: March 12, 2016 1:36 AM