दोन वर्षे उलटली : शेतकऱ्यांचे धान्य साठविण्यास अडचणभामरागड : अतिरिक्त केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत भामरागड तालुक्यातील कोठी येथे २०१३-१४ या वर्षात कृषी गोदामाचे बांधकाम करण्यात आले. गोदामाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही जिल्हा परिषदेकडे गोदामाचे हस्तांतरण करण्यात आले नाही. त्यामुळे धान साठविण्यास शेतकऱ्यांना अडचण झाली आहे.कोठी ग्रामपंचायतीने कृषी गोदामाची मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या कामाला तत्काळ हिरवी झेंडी दाखविली व निधी उपलब्ध करून दिला. कृषी गोदामाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सदर गोदाम ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करणे आवश्यक होते. मात्र बांधकाम पूर्ण होऊनही ग्रामपंचायतीकडे गोदाम हस्तांतरित करण्यात आले नाही. एवढेच नाही तर या गोदामाचे उद्घाटनसुद्धा करण्यात आले नाही. कोठी आदिवासी विविध सहकारी संस्थेच्या वतीने हमीभाव धान खरेदी केंद्र चालविले जाते. या संस्थेच्या मार्फतीने हजारो क्विंटल धान खरेदी केले जाते. मात्र गोदाम नसल्याने धान उघड्यावर ठेवावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी व संस्थेचेही नुकसान होत आहे.बांधलेले गोदाम ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झाले असते तर हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी केलेले धान साठविता आले असते. यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्न प्राप्त झाले असते. संस्थेचेही धान सुरक्षित राहिले असते. एक महिन्यानंतर शेतकऱ्यांचे धान निघणार आहे व धान खरेदी केंद्रसुद्धा सुरू होईल. तत्पूर्वी सदर गोदाम ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी होत आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. गोदाम हस्तांतरित का झाले नाही, याबाबत कोठी येथील नागरिक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)
कोठी गोदामाचे हस्तांतरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2016 2:29 AM