रमेश मारगोनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : आजपर्यंत बांबूची विक्री नगाप्रमाणे केली जात होती. मात्र भामरागड तालुक्यातील कुचेर ग्रामपंचायतीने बल्लारपूर पेपरमिलला वजनाप्रमाणे बांबू विकण्यास सुरूवात केली आहे. याबाबतचा करारही पूर्ण झाला असून बांबूचे ट्रक रवाना सुध्दा झाले आहेत. तब्बल दोन वर्षापासून थांबलेले बांबूचे व्यवहार पुन्हा सुरूवात झाल्यामुळे ग्रामसभांना आता ‘अच्छे दिन’ येण्याची आशा बळावली आहे.जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात बांबू आहेत. बांबूचा दर्जा अतिशय चांगला असल्याने बांबूला चांगली किंमत व मागणी आहे. यापूर्वी वन विभाग बल्लारपूर पेपरमिलला बांबूची विक्री करीत होते. मात्र पेसा कायद्यानुसार आता सभोवतालचे जंगल ग्रामसभांच्या मालकीचे झाले असल्याने वन विभागाने बांबू विक्रीतून आपले अंग काढले आहे. ग्रामसभांना जरी बांबू विक्रीचे अधिकार प्राप्त झाले असले तरी बांबूची तोड करून त्याची विक्री कशी करावी, याचे कौशल्य नसल्याने बांबू जंगलातच पडून राहत होता. काही वर्षानंतर बांबूचे झाड करपून ते कुजते. अशा पध्दतीने जिल्हाभरातील शेकडो कोटी रूपयांचा बांबू जंगलातच नष्ट होत होता.भामरागड पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी यांनी बांबूची विक्री यापुढे वजनाप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला. टेकला ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या कुचेर ग्रामवासीयांना सोबत घेऊन सुखराम मडावी यांनी बल्लारपूर गाठले. तेथील पेपरमिलच्या अधिकाºयांसोबत चर्चा केली. चर्चेमध्ये ४ हजार ५०० रूपये टनाप्रमाणे बांबू विक्रीचा सौदा पार पडला. यामध्ये वाहतूक खर्च, सर्व्हिस टॅक्स देण्याची जबाबदारी पेपरमिलची राहिल. तर रस्ते दुरूस्त करणे, दोरी व इतर खर्च ग्रामसभा करेल, असे ठरविण्यात आले. विशेष म्हणजे, आजपर्यंत ट्रक किंवा बांबूच्या नगाप्रमाणे बांबूची विक्री केली जात होती. मात्र आता वजनाप्रमाणे बांबूची विक्री केली जाणार असून अशा पध्दतीने विक्री करणारे कुचेर हे जिल्ह्यातील पहिले गाव असण्याची शक्यता आहे.बल्लारपूर पेपरमिलला मोठ्या प्रमाणात बांबूची आवश्यकता भासते. त्यामुळे बांबू तोडाईच्या माध्यमातून शेकडो स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ग्रामसभेलाही अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होईल.संपूर्ण व्यवहार होणार कॅशलेसआर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी बांबू विक्रीची संपूर्ण रक्कम ग्रामसभेच्या खात्यात धनादेशाद्वारे जमा केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत रोकड स्वीकारली जाणार नाही. भामरागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांबू आहे. या बांबूची विक्री होत नसल्याने सदर बांबू जंगलातच सडत आहे. मात्र बांबूला नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्धार गावातील नागरिकांनी केला आहे. देशपातळीवर भामरागडचा बांबू पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
कुचेर गावाने विकला वजनानुसार बांबू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:08 PM
आजपर्यंत बांबूची विक्री नगाप्रमाणे केली जात होती. मात्र भामरागड तालुक्यातील कुचेर ग्रामपंचायतीने बल्लारपूर पेपरमिलला वजनाप्रमाणे बांबू विकण्यास सुरूवात केली आहे. याबाबतचा करारही पूर्ण झाला असून बांबूचे ट्रक रवाना सुध्दा झाले आहेत. तब्बल दोन वर्षापासून थांबलेले बांबूचे व्यवहार पुन्हा सुरूवात झाल्यामुळे ग्रामसभांना आता ‘अच्छे दिन’ येण्याची आशा बळावली आहे.
ठळक मुद्देनाविन्यपूर्ण प्रयोग : अनेक वर्षांपासून रखडलेल्या बांबू विक्रीला मिळणार चालना