पाणी बचत करण्याचे नागरिकांना आवाहन : सार्वजनिक नळांना लावल्या तोट्याकुरखेडा : लोकमत वृत्तपत्र समुहाने राज्यस्तरावर जलमित्र अभियान सुरू केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातही शनिवारपासून या अभियानाचा शुभारंभ झाला. या अंतर्गत रविवारी कुरखेडा नगर पंचायतीने या अभियानाला आपला पाठींबा दर्शवत कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शहरातील सार्वजनिक नळांना तोट्या बसवून नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करण्यात आले. लोकमतच्या या उपक्रमाचे कुरखेडावासीयांनी जोरदार स्वागत केले.कुरखेडा गावाला सती नदीतून पाणी पुरवठा केला जातो. परंतु यंदा पहिल्यांदाच शहराच्या अनेक वार्डांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाण्याचे मोल नागरिकांना कळावे व उन्हाळ्याच्या दिवसात त्यांनी पाण्याची बचत करावी, या उद्देशाने कुरखेडा नगर पंचायतीने लोकमतच्या या जलमित्र अभियानाला पाठींबा दर्शविला. शहरातील बाजार वार्ड, श्रीरामनगर आदी भागातील सार्वजनिक नळांना तोट्या लावण्यात आल्या व या नळांवर पाणी बचतीचा संदेशही लोकमत जलमित्र अभियानाच्या माध्यमातून देण्यात आला. तसेच शहरांच्या टंचाईग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे, हे पाणी काटकसरीने वापरावे. या उद्देशाने टँकरवरही लोकमत जलमित्र अभियानाचे स्टिकर लावण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष महेंद्रकुमार मोहबंशी, पाणी पुरवठा सभापती पुंडलिक देशमुख, विरोधी पक्ष नेते रवींद्र गोटेफोडे, महिला व बाल कल्याण उपसभापती चित्रा गजभिये, नगरसेवक अॅड. उमेश वालदे, संतोष भट्टड, उस्मानखॉ पठाण, रामहरी उगले, अनिता बोरकर, अर्चना वालदे, नंदिनी दखणे, रूपाली देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पालिका कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पाणी बचतीसाठी कुरखेडा नगर पंचायत सरसावली
By admin | Published: May 23, 2016 1:24 AM