हा तालुका पेसा कायद्यांतर्गत समाविष्ट असल्याने येथील सर्व ४५ ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीकरीता राखीव ठेवण्यात आले. ४५ पैकी ४३ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. २२ जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात आला होता. दोन ग्रामपंचायतचा कालावधी शिल्लक असल्याने त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया झालेली नाही, मात्र सोमवारी सर्वच ४५ ठिकाणची आरक्षण सोडत काढण्यात आली.
मागील पंचवार्षिकमध्ये अनूसूचित जमाती सर्वसाधारणकरिता असलेल्या २२ ग्रामपंचायती यावेळी अनुसूचित जमाती महिलांकरिता आरक्षित करण्यात आल्या. तसेच मागील वेळेस महिला आरक्षित असलेल्या चिखली ग्रामपंचायतचे सरपंचपद ईश्वरचिठ्ठीद्वारे यावेळीसुद्धा महिलांकरिता आरक्षित करण्यात आले. यावेळी कढोली, शिरपूर, गेवर्धा, जांभूळखेडा, आंधळी (सोनपूर), अंगारा, भटेगाव, वडेगाव, मालदुगी, खेडेगाव, शिवणी, चिरचाडी, भगवानपूर, अंतरगाव, कुंभीटोला, चारभट्टी, गुरनोली, रानवाही, सोनसरी, पलसगड, मालेवाडा, आंधळी (नवरगाव) व चिखली येथील सरपंचपद अनूसूचित जमाती महिलांकरिता आरक्षित करण्यात आले आहे. तर नान्ही, बांधगाव, उराडी, तळेगाव, अरततोंडी, चिनेगाव, खरकाडा, नवेझरी, पुराडा, येंगलखेडा, घाटी, बेलगाव (खैरी), गोठणगाव, चरविदंड, कातलवाडा, रामगड, सोनेरांगी, दादापूर, सावलखेडा, धनेगाव, खोब्रामेंढा या ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जमाती सर्वसाधारणकरिता आरक्षित ठेवण्यात आले आहे.