कुरुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डाॅक्टरांची दोन पदे मंजूर आहेत. मागील १४ वर्षांपासून येथील रुग्णसेवा एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. मंजूर पदावरील वैद्यकीय अधिकारी डाॅ. टेकाम यांची प्रतिनियुक्ती कोरची तालुक्यातील कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे.
कुरूड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण ६ उपकेंद्र येत असून, कुरूडअंतर्गत तुळशी, कोकडी, शिवराजपूर, कोंढाळा आदी माेठ्या गावांसह अन्य खेडी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्राचा डोलारा एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर उभा ठेवण्यात आल्याने शासकीय उपक्रम राबविताना कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. कधी कधी तर नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. कोरोना कालावधीत शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहाेचवणे गरजेचे असताना रिक्त पदांमुळे आराेग्यसेवेवर परिणाम हाेत आहे. त्यामुळे येथे वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा दादाजी भर्रे यांनी दिला आहे.