हेमलकसातील प्रकार : महाराष्ट्र बँक अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हभामरागड : तालुक्यातील हेमलकसा स्थित महाराष्ट्र बँकेच्या एटीएममधून कुजल्या व फाटक्या नोटा निघाल्याचा प्रकार सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. एटीएममधून कुजल्या व फाटक्या नोटा निघाल्यामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.१२ सप्टेंबर रोजी रविवारला दुपारी ३ वाजून ७ मिनीटांनी तालुक्यातील गोंगवाडा येथील रहिवासी युवक सुधाकर दोबा मज्जी यांनी ८ हजार रूपये बँक आॅफ महाराष्ट्रच्या हेमलकसा येथील एटीएममधून काढले. यावेळी ५०० रूपयांच्या १५ नोटा व १०० रूपयांच्या ५ नोटा निघाल्या. मात्र यातील ५०० रूपयांच्या ५ नोटा कुजल्या व खराब असून काही नोटा फाटक्या आहेत. त्यामुळे सदर नोटा चलनात कुणीही घेऊ शकणार नाही, अशी शक्यता आहे. त्यामुळे सुधाकर मज्जी याला २ हजार ५०० रूपयांचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे. याबाबत बँक आॅफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन सुधाकर मज्जी याला मिळालेल्या फाटक्या नोटा बदलवून द्याव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच बँक प्रशासनाने यापुढे फाटक्या व कुजल्या नोटा एटीएममध्ये टाकू नये, याची खबरदारी घ्यावी, तसेच महाराष्ट्र बँकेच्या येथील दोन्ही एटीएममधून ग्राहकांना उत्तम सुविधा पुरवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र बँक शाखेच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)
एटीएममधून निघाल्या कुजक्या व फाटक्या नोटा
By admin | Published: September 14, 2016 1:42 AM