उपवनसंरक्षकांकडे तक्रार : पाच महिने उलटूनही रक्कम न मिळाल्याने मजूर संतप्त लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : आरमोरी वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र हिरापूर (रिठ) मधील ब श्रेणीच्या जंगलात २५ हेक्टर क्षेत्रात मिश्र रोपवनाचे काम फेब्रुवारी २०१७ मध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले. सदर काम पूर्ण होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र रोपवनात काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीची रक्कम अद्यापही मिळाली नाही. यासंदर्भात मजुरांनी वडसाच्या उपवनसंरक्षकांकडे तक्रार केली आहे. रोपवनातील कोरका (अनावश्यक झाडे) कटाईचे काम मजुरांकरवी ५२१ रूपये प्रतिदिवस या दराने हजेरीपटानुसार केले जाते. मात्र या बिटाचे वनसंरक्षक व क्षेत्र सहायकांनी २५ हेक्टर रोपवनाच्या कोरका कटाईचे काम हुंडा पद्धतीने केवळ ४० हजार रूपयात करून मजुरांची फसवणूक केली. त्यामुळे मजुरांना त्यांच्या श्रमाचा अत्यल्प मोबदला मिळाला. रोपवनाचे काम संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या मार्फतीने हुंडा पद्धतीने केले जात नाही. या कामात वनरक्षक व क्षेत्र सहायकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोप तक्रारकर्त्या मजुरांनी केला आहे. या रोपवनातील कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून काम करणाऱ्या मजुराची मजुरी तत्काळ देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला. या संदर्भात ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक वडसा यांना निवेदन दिले आहे. यंत्राच्या सहाय्याने डीपीसीसीटीचे खोदकाम संयुक्त वनव्यवस्थापन समिती मेंढेबोडी येथील सदस्यांची सभा न घेता तसेच या सदस्यांना विश्वासात न घेता टीसीएम ऐवजी डीपीसीसीटीचे खोदकाम यंत्राच्या सहाय्याने करण्यात आले. याबाबत मजुरांनी संबंधित वनकर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांना कामावरून बंद करून दुसरे मजूर कामावर घेण्यात आले. परिणामी मेंढेबोडी येथील गावकऱ्यांवर बेरोजगारीची पाळी आली आहे. विद्युत पंपाचे बिल थकीत रोपवनाचे सीमांकन करणे, भाग पाडणे या कामापोटी केवळ १५० कोटी रूपये देण्यात आले. ज्या शेतमालकाच्या शेतात रोपवाटिका तयार करण्यात आली, त्या शेतमालकाचे विद्युत पंपाचे बिल अद्यापही अदा करण्यात आले नाही. आरमोरी वनपरिक्षेत्रातील सुकाळा कक्ष क्र. ७२० मधील रोपवन वनव्याने जळू नष्ट झाले आणि मेंढेबोडी येथील रोपवनात काम करणाऱ्या मुराची मजुरी मिळाली नाही. या दोन्ही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जळलेल्या रोपवनाची नुकसान भरपाई जबाबदार कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येईल. तसेच मेंढेबोडी येथील मजुरांची मजुरीची रक्कम तत्काळ देण्यात येईल. - व्ही. व्ही. होशिंग, उपवनसंरक्षक, वन विभाग, वडसा
रोपवनाच्या मजुरांची मजुरी थकली
By admin | Published: June 01, 2017 1:56 AM