यंत्रणा सुस्त : अहेरीवरून बोलाविले वाहनअहेरी : अहेरी जवळील महागाव येथील अनुष्का ज्ञानेश्वर रामटेके या १० वर्षीय सिकलसेलग्रस्त बालिकेची रविवारी सायंकाळी ७ वाजता अचानक तब्येत खराब झाली. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. मात्र तब्येत गंभीर झाल्याने व वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात हलविणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत महागाव आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तब्बल एक ते दीड तासापर्यंत रुग्णाला रूग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागली. महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही. या रुग्णवाहिकेचा चालक रजेवर असल्याने अहेरीचा खाजगी चालक ही रुग्णवाहिका चालवितो. रूग्णवाहिका नसल्याने नातेवाइकांनी महागावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्का उईके यांच्याशी संपर्क केला. डॉ. अल्का उईके यांनी तत्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयातून रुग्णवाहिका महागाव येथे पाठविली. सिकलसेलग्रस्त बालिकेला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ढासळलेल्या आरोग्य सेवेबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला. (प्रतिनिधी)
रूग्णवाहिकेचा अभाव बालिकेची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2017 12:48 AM