झिंगानूर : परिसरातील लोहा व येडसिली गावात अद्यापही मूलभूत सोयी-सुविधा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे या गावाचा विकास झाला नाही. गावात मूलभूत सोयी-सुविधा पोहोचविण्याकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
लोहा गावाचा समावेश अहेरी तालुक्यात आहे, तर येडसिली गाव सिरोंचा तालुक्यात येते. दोन्ही गावे झिंगानूर परिसरात आहेत; परंतु या गावांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहे. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही गावाच्या विकासाला गती मिळाली नाही. लोहा गावात १०० टक्के आदिवासी समाज आहे; परंतु येथे अद्यापही वीज पोहोचली नाही. गावातील नागरिकांना नियमित आरोग्यसेवा मिळत नाही. गावातील नागरिक शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येते. येथे पक्के रस्ते, नाल्या व पिण्याच्या पाण्याच्या सोयीचा अभाव आहे.
लोहा गावात जुन्या काळातील एक विहीर आहे. १९८३ मध्ये या गावात एक हातपंप बसविण्यात आला. त्यानंतर २०१९ मध्ये बोअरवेल खोदकाम करण्यात आले; परंतु या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले नाही.