लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : अतिसंवेदनशील मागास कोरची तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य पूर्णत: शासकीय रुग्णालयावर अवलंबून आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व पथकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने येथील आरोग्य सेवा पांगळी झाली आहे. याशिवाय औषधसाठा विविध सोयीसुविधांचा अभाव आहे. मात्र याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.तालुक्यात बोटेकसा व कोटगूल या दोन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. एका केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर आहेत. याशिवाय बेतकाठी, मसेली व इतर उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद मंजूर आहे. मात्र दोन पीएचसी व उपकेंद्र मिळून तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त आहेत. बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.भूनेश्वर यांची नियुक्ती झाली होती. परंतु त्यांची तात्पुरती पदस्थापना म्हणून कढोली येथे नेमणूक करण्यात आली. त्यामुळे बोटेकसा आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी नियमित नाही.बोटेकसा आरोग्य केंद्राअंतर्गत मसेली येथे प्राथमिक आरोग्य पथक आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेंद्र खोबा हे वैद्यकीय रजेवर आहेत. बेतकाठी प्राथमिक आरोग्य पथकात डॉक्टराचे एक पद असून ते सुद्धा रिक्त आहेत.कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.प्रदीप वासनीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते सुद्धा वैद्यकीय रजेवर आहेत. कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांची तीन पदे मंजूर असून तेथील सर्वच पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा भार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या खांद्यावर पडला आहे.याशिवाय तालुक्यात एकूण पाच मानसेवी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील तिनच डॉक्टर नियमित आहेत. कोहका येथील मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या बोरकर या प्रसूती रजेवर आहेत. कोसमी नं.२ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा लांजेवार यांनी राजीनामा दिला आहे. बोटेझरी, नवेझरी व कोटरा येथील मानसेवी डॉक्टर नियमितपणे सेवा देत आहेत. एकूणच नियमित वैद्यकीय अधिकारी व मानसेवी डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा पूर्णत: अस्थिपंजर झाली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना चांगली व वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यासाठी तालुक्यात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे.पावसाळ्यात रानकट्टा व मर्दिनटोलात आरोग्य शिबिरकोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हरिष टेकाम यांनी बोटेझरी उपकेंद्राअंतर्गत रानकट्टा व मर्दिनटोला येथे १ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिर आयोजित केले. सदर दोन्ही गावातील लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आला. गरोदर माता तपासणी, रक्त तपासणी तसेच क्षयरोग व कुपोषणाबाबतची तपासणी करून त्यांना औषधी देण्यात आली. ४५ रुग्णांची मलेरिया किटद्वारे आजाराबाबत तपासणी करण्यात आली. यात दोन रुग्ण मलेरियाचे तर विषाणूजन्य तापाचे १२ रुग्ण आढळून आले. याशिवाय उच्च रक्तदाब, क्षयरोग व अॅनिमियाचाही एक-एक रुग्ण आढळून आला. या सर्वांना औषधी वितरित करण्यात आली. रानकट्टा गावाच्या अलिकडे नाल्यावर पाणी असल्याने वाहन तेथेच थांबवून कर्मचाऱ्यांना पायी जावे लागले.
रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा पांगळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 12:40 AM