आरमोरी तहसीलदार यांच्याकडून रामपूर रेतीघाट जवळपास साडेसहा हजार ब्रास रेती काढण्यासंदर्भात दोन दिवसापूर्वी आदेश देऊन रेतीचा उपसा संबंधित निविदा निविदेतील कंत्राटदाराकडून करण्यात आला आहे. देशावर कोराेनासारख्या महामारीचे भीषण संकट असताना व जिल्ह्यामध्ये रोजचे असंख्य रुग्ण कोरोना आजाराने दगावत असताना तहसीलदारांना या महत्त्वपूर्ण बाबींचे विस्मरण झाल्यामुळे रामपूरचा रेतीघाट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. अनेक ट्रॅक्टरवरील शेकडो मजूरवर्ग रेतीघाटामध्ये रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरून नदीपात्राच्या बाहेर काढण्यासाठी एकत्र गर्दी करीत आहेत. एकीकडे मजुरांना मजुरी मिळत असली तरी दुसरीकडे घाटांमध्ये विविध गावांतून येणारे मजूर एकत्र काम करीत असल्यामुळे आणि गावागावात रोज ये-जा करताना कसला तरी संबंध येत असल्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन कोराेना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी परिसरातील जनतेने केली आहे.
रामपूर रेती घाटावर सोशल डिस्टन्सिंगचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:46 AM