सांडपाण्यामुळे आरोग्य बाधित
अहेरी : तालुक्यातील अनेक गावांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. त्यातून डासांची पैदास वाढली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. ग्रामपंचायतीने नाल्यांची सफाई करावी, सांडपाणी वाहून नेणारा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम
चामाेर्शी : जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो, याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडतो आहे. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमाही सुशोभित दिसेल, तसेच या माध्यमातून शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्ह्यातील शिवभोजनाचे केंद्र वाढावे
गडचिराेली : शासनाने शिवभोजन केंद्रं सुरू केली आहेत; मात्र, त्याच्यातील थाळींची संख्या मोजकीच ठेवली आहे. शिवाय केंद्रांची संख्या कमी आहे.
नळ योजनेच्या तांत्रिक अडचणी दूर करा
आलापल्ली : जिल्ह्यातील अनेक गावात नळयोजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या; परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. तांत्रिक अडचणी अजूनही दूर झाल्या नाहीत.
रोजगार हमीची कामे सुरू करावी
चामाेर्शी : परिसरात शेतमजुरांची संख्या बरीच आहे; मात्र रोहयोची कामे सुरू करण्यात आली नाहीत. मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने सिंचन व कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कामे सुरू केली होती. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले; मात्र यावर्षी जॉबकार्ड वाटप करूनही काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे कुटुंब कसे चालावे, हा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे.
वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी
देसाईगंज : क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. परिणामी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी आहे.
दुधाळ गाईंचे वाटप करावे
आरमाेरी : जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे; मात्र बऱ्याचशा पशुपालकांकडे हडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांना दुधाळ गाईचे वाटप करावे, अशी मागणी हाेत आहे.
अन्नपदार्थांची विक्री थांबविण्याची मागणी
गडचिराेली : जिल्ह्यातील ग्रामीण भागांत काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले, तरी काही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता
सिराेंचा : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने स्लिप होऊन अपघात होत आहे. काही नागरिकांनी घराचे बांधकाम करण्यासाठी रेती टाकली. ही रेती रस्त्यावर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहे.
तंटामुक्त समित्यांना सक्रिय करा
आष्टी : तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावातील तंटे गावात सोडविण्यासाठी गावागावांत तंटामुक्त समितीची स्थापना केली. पूर्वी या समितीला चांगले दिवस होते; मात्र सद्यस्थितीत या समित्या थंड बस्त्यात आहेत.
झुडुपामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात
धानाेरा : शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य शासनाने गावागावात तलाव, बोडी तयार केल्या; मात्र यातील बहुतांश गावांतील तलावात व बोड्यांमध्ये झुडपे वाढल्याने पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात खरीप तसेच रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मैदानी खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर
आलापल्ली : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे; मात्र सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. मोबाइल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. मैदानी खेळ लुप्त होण्याची भीती आहे.
सरपणासाठी महिला जंगलात
घाेट : आर्थिकदृष्ट्या गॅस सिलिंडर परवडणारा नाही, तसेच रॉकेल देणेही शासनाने बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश गरीब महिला स्वयंपाकासाठी सरपणाचा वापर करतात. वन्य प्राण्यांच्या दहशतीत महिलांना जंगल व शेतालगत फिरावे लागत आहे, त्यामुळे सिलिंडर, तसेच राॅकेलचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
एटापल्लीतील अनेक शाळा विजेविनाच
एटापल्ली : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत; मात्र शाळेमध्ये वीज पुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळ खात आहेत. काही शाळांना वीज पुरवठा होता; मात्र वीज बिल भरला नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत.
कुरखेडातील नळ जोडणी तपासा
कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचल्या जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. कुरखेडा शहरात अनेक ठिकाणी नळ पाइपलाइन लिकेज असल्याने पाण्याचा अपव्यय हाेत आहे.
भामरागडतील गावे लाइनमनअभावी
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते; परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते, तसेच एका लाइनमनकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा
आष्टी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्यांवर २० ते २५ मोकाट जनावरांचा कळप दिवसभर बसून राहतो. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. आष्टीच्या मुख्य चौकात मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. चौकातून गडचिरोली, अहेरी, गोंडपिपरी येथून वाहने येतात.