धानाेरा तालुक्यातील घटना
धानोरा (गडचिराेली) : जीवन हे क्षणभंगूर आहे. ते केव्हा पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे विरेल, याची शाश्वती नाही. हसत-खेळत असलेल्या व्यक्तीचे प्राण एखाद्या पक्षाप्रमाणे केव्हा उडेल, याची किंचितही कल्पना कुणालाच करता येत नाही. अशीच ह्रदयद्रावक घटना धानाेरा तालुक्यात शनिवार १७ सप्टेंबर राेजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली. रस्त्याच्या कडेला बिनधात स्वमालकीची गुरे चारणाऱ्या महिलेला प्रवासी वाहनाने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वाहनावर यमराजाच्या रुपाने काळच आल्याची प्रचिती परिसरातील लाेकांना आली.
यमुना दयाराम मेश्राम (५० वर्षे) रा. मुरमाडी असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. धानाेरा तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावरील येरकड-मालेवाडा रोडवरील ईरूपटोला फाट्यावर यमुना मेश्राम ही महिला स्वमालकीची गुरे चारत हाेती. कुटुंबात ती एकटीच. तिच्या मागेपुढे कुणीच नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे ती शनिवारी सकाळी १०:३० वाजतानंतर आपली गुरे घेऊन धानोरा- कुरखेडा मार्गावर आली. ईरूपटाेला मार्गालगत ती गुरे चारत हाेती. याचवेळी कुरखेडा येथील एमएच ३३ ए ४८०१ क्रमांकाचे प्रवासी वाहन धानोरा येथून प्रवाशी घेऊन दुपारी १२ वाजता कुरखेडामार्गे जात होते.
तेव्हा महिला ईरूपटाेला रस्त्यालगत गुरे चारत हाेती. तिला प्रवासी वाहनाचा आवाज आला नाही. एकाएक वाहन समाेर पाहताच ती गाेंधळली. वाहनधारकाने तिला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; पण याच वेळी तिला वाहनाची जाेरदार धडक बसल्याने ती रस्त्याच्या कडेला फेकली गेली व तिचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने वाहनातील प्रवाशी सुखरूप बचावले.