आमदार उपस्थित : तेलंगणा, महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांची अहेरीत बैठक अहेरी : प्राणहिता नदीवर तेलंगणा व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणाऱ्या अहेरी-गुडेम या पुलाचे बांधकाम सुरू आहे. २०१८ पर्यंत हे बांधकाम पूर्ण होणार असून पूल परिसरातील पाच एकर जमीन भूसंपादित केली जाणार आहे. या संदर्भातील बैठक शुक्रवारी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अहेरी येथे पार पडली. या बैठकीत पुलाच्या बांधकामाबाबतचा आढावा घेण्यात आला. यासवेळी तेलंगणा राज्यातील कोमरम भिम कागजनगरचे जिल्हाधिकारी एम. चंपालाल, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, तेलंगणाचे आ. कोनेरू कोनप्पा, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक कुमार, उपविभागीय अधिकारी राममूर्ती, भूसंपादन जिल्हाधिकारी शैलेश मेश्राम, पाटबंधारे विभागाचे ए.एस. पोहणे, तहसीलदार प्रशांत घोरूडे, नायब तहसीलदार वनीता नेरलवार, सिंचाई विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी. एम. इंगोले उपस्थित होते. महाराष्ट्रातील जवळपास ५ एकर जमीन पुलाच्या कामाकरिता भूसंपादन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. मार्च २०१८ पर्यंत काम पूर्णत्वास जाईल, असा आशावाद आ. कोनेरू कोनप्पा यांनी व्यक्त केला. पूल बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाचेही सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
अहेरी-गुडेम पूल परिसरातील पाच एकर जागा भूसंपादन करणार
By admin | Published: March 18, 2017 2:26 AM