अहेरी शहर उजळले : १६ लाख ५० हजार रूपयांचा खर्च; पालकमंत्री उपस्थितलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : शहरातील प्रमुख तीन चौकातील हायमास्ट लाईटचे लोकार्पण रविवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे तीन प्रमुख चौकातील अंधार दूर होण्यास मदत होणार आहे. अहेरी येथे तीन चौकांमध्ये रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. रात्रीच्या सुमारास आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या चौकांत हायमास्ट लाईट लावण्याची मागणी नागरिकांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी आपल्या स्थानिक आमदार निधी २०१६-२०१७ अंतर्गत अहेरी शहरातील कै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौक, दानशूर चौक, तसेच छोटा बसस्टॉप चौक आदी तीन प्रमुख चौकांमध्ये हायमास्ट लाईट लावण्यासाठी प्रत्येकी ५.५० लाख प्रमाणे १६.५० लाख रूपये मंजूर केले. त्यानंतर येथे हायमास्ट लाईट लावण्यात आले. रविवारी हायमास्ट लाईटचा लोकार्पण सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्राजक्ता पेद्दापल्लीवार, उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी शहर अध्यक्ष मुकेश नामेवार, नगर पंचायत सभापती नारायण सिडाम, नगरसेवक गिरीष मदेर्लावार, अंभियता कटकमवार, सचिन पेद्दापल्लीवार, शंकर मगडीवार, उमेश गुप्ता, गुड्डू ठाकरे, पवन गद्देवार, सह भाजपा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.एलईडी हायमास्टसह अग्निशमन वाहन मिळणारअहेरी शहरातील प्रमुख २० कॉर्नरवर ९ मीटर उंचीच्या पोलचे एलइडी हायमास्ट लावण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून येत्या १ महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. शहरासाठी भूमीगत गटार योजना, भूमीगत विद्युत तार योजना, प्रशस्त व सुंदर बगीचा, प्रशस्त क्रीडा स्टेडीयम, मोक्ष धाम, आलापल्ली मार्गावरील तलावाचे सौंदर्यीकरण, अहेरी बस स्टँडचे सौंदर्यीकरण आदी विकास कामे दोन वर्षात पूर्ण केले जातील, असे आश्वासन पालकमंत्री आत्राम यांनी दिले. येत्या १० दिवसात ७५ लाख रूपये किमतीचे अग्निशमन वाहन अहेरी शहरवासीयांच्या सेवेत दाखल होणार आहे, असेही पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले.
तीन चौकात हायमास्टचे लोकार्पण
By admin | Published: July 11, 2017 12:42 AM