खासदारांचे आवाहन : लसीकरण कार्यक्रमात पालकांनी जागृत राहून सहभाग नोंदवावागडचिरोली : केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसार मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली अंतर्गत कार्यरत असलेल्या चंद्रपूर येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने माता-बाल आरोग्य (लसीकरण) इंद्रधनुष्य मिशन कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी खा. अशोक नेते यांच्या उपस्थितीत गडचिरोली तालुक्यातील येवली येथे बुधवारी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवलीच्या सरपंच गीता सोमनकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रणजीतकुमार उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना खा. अशोक नेते म्हणाले की, गडचिरोली जिल्हा ८० टक्के जंगलाने व्याप्त आहे. या जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू, सिकलसेलसारख्या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बालकांना विविध रोग व आजारापासून वाचविण्यासाठी वेळीच लसिकरण करणे आवश्यक आहे. पालकांनीही याबाबत जागृक राहून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी विदेशात व देशात सरासरी वयोमानाचा संदर्भ विचारात घेऊन भारतात नागरिकाचा आयुर्मान वाढविण्याकरिता आरोग्य सेवेचा लाभ जनतेने घेतला पाहिजे, याअंतर्गत लसिकरण कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, आरोग्य पथक येवलीच्या डॉ. अस्मिता देवगडे, डॉ. म्हशाखेत्री आदींनीही मार्गदर्शन केले. दोन दिवस या कार्यक्रमात आरोग्य तपासणी, माता, बाल आरोग्य लसिकरण व मिशन इंद्रधनुष्य मोहीम जनजागृती, किशोरवयीन मुलींची तपासणी, सुदृढ बालक स्पर्धा, अंगणवाडीद्वारे सकस आहार, आरोग्य विभागातर्फे फोटो प्रदर्शनी, औषध वितरण, तपासणी शिबिर, प्रश्नमंजुषा, शालेय विद्यार्थ्यांचे कलापथक आदी कार्यक्रम घेण्यात आले.या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खा. अशोक नेते, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, अंकुश चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी विलास भांडेकर, सुरेखा भांडेकर, राहुल ठवरे, मनीषा खोब्रागडे, भालचंद्र रामटेके, रामचंद्र सोनसल, संजय तिवारी, नरेंद्र शेंडे आदी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन सी. पी. भांडेकर तर आभार संजय तिवारी यांनी मानले. या अभियानाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात येवली येथून बुधवारी शुभारंभ झाला. त्यानंतर आता २३ सप्टेंबरला आरमोरी तालुक्याच्या वडधा व ४ नोव्हेंबरला देसाईगंज तालुक्याच्या विसोरा व ३ डिसेंबरला चामोर्शी तालुक्यातील तळोधी येथे कार्यक्रम होणार आहे. या सर्व गावांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती केली जाणार आहे.
येवलीतून इंद्रधनुष्य अभियानाचा शुभारंभ
By admin | Published: September 17, 2015 1:40 AM