शेतकऱ्यांचा भ्रमनिराश : कर्जबाजारीपणातून जिल्ह्यात ५० पेक्षा जास्त आत्महत्यागडचिरोली : महाराष्ट्रातील सर्वात समस्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याकडे कर्जमुक्तीच्या निमित्ताने विरोधी पक्षाने काढलेल्या संघर्ष यात्रेने पाठ फिरविल्याने या जिल्ह्यातील सर्व सामान्य शेतकरी व नागरिकांचा मोठा भ्रमनिराश झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारी विरोधी पक्षाची संयुक्त कर्जमुक्तीची संघर्ष यात्रा चंद्रपूर जिल्ह्यातून सुरूवात करण्यात आली. ही यात्रा मागास गडचिरोली जिल्ह्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी काढली असती तर या भागातील सिंचन, वीज व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्यांना समजल्या असत्या. नक्षलग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्नही या निमित्ताने विरोधी पक्ष नेत्यांना जाणून घेता आले असते, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गडचिरोली माजी पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्यामध्ये ही संवेदनशीलता होती. त्यांनी या भागातील लोकांचे अश्रू पुसण्याचे काम पोटतिडकीने केले. सोबतच या भागाच्या विकासाची धूराही स्वत:वर लादून घेतली. हा भाग मुंबई, पुण्यापेक्षा ५० वर्ष मागे आहे, असे आर. आर. पाटील नेहमीच म्हणायचे. स्वत: आर. आर. पाटील यांनी पालकमंत्री असताना विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांना सिरोंचा व अहेरी येथे नेऊन तेथील अडचणीबाबत अवगत करून दिले होते. एवढेच नव्हे तर अहेरी येथे आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत घेतली. त्यांनाही सर्वसामान्याच्या अडचणी समजावून देण्याचे काम केले होते. एवढी संवेदनशीलता सध्याच्या विरोधी पक्षनेत्यांमध्ये व आमदारांमध्ये नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी चांदा ते बांदा अशी यात्रा काढून ेगडचिरोली जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात २००३ पासून ५० वर अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चामोर्शी तालुक्याच्या घारगाव येथे ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असे असताना संघर्ष यात्रा गडचिरोलीत आली नाही. याची खंत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)
संघर्ष यात्रेतील विरोधी पक्ष नेत्यांनी फिरविली गडचिरोलीकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 1:03 AM