लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात लग्न समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. शिवाय काही गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाचा शेवट सार्वजनिक सामूहिक भोजनाने केला जात आहे. मात्र या कार्यक्रमात प्लास्टिकपासून तयार झालेल्या पत्रावळीचाच वापर केला जात आहे. परिणामी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पानाच्या पत्रावळी लुप्त झाल्या आहेत.पूर्वी विवाह सोहळा म्हटला की, ग्रामीण भागात दीड महिन्यापासून तयारी सुरू व्हायची. सामूहिक भोजनावळीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घराशेजारच्या तसेच संबंधातील लोकांना गावानजीकच्या झुडूपी जंगलात मोह तसेच पळसाचे पान तोडण्यासाठी पाठविले जात होते. मित्र मंडळी तसेच काही आप्तेष्ठ चार ते पाच दिवस सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जंगलात जाऊन पाने तोडायचे. त्यानंतर या पानापासून रात्री भोजनानंतर पत्रावळी बनविण्याची लगबग सुरू व्हायची.पूर्वी ग्रामीण भागात रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत पत्रावळी तयार करण्याचे काम चालत होते. मात्र आता काळाच्या ओघात पत्रावळीसाठी लागणारे पाने तोडणे व त्यापासून पत्रावळी बनविणे हा प्रकार बंद झाला आहे. केवळ धार्मिक कार्यक्रमात अत्यल्प प्रमाणात पानापासून पत्रावळी तयार करून त्याचा वापर केला जात आहे. मात्र सामूहिक व भोजनावळीत पानापासून तयार केलेल्या पत्रावळी दिसून येत नाही. शहरी भागात कागद व प्लास्टिकपासून तयार झालेल्या पत्रावळीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातही या प्रकाराचे लोण पसरले असून याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आता ग्रामीण भागात लग्न कार्यासाठी जवळचे आप्तेष्ठ एकादिवसापूर्वी संबंधित कार्यक्रम आयोजकांच्या घरी पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच आधुनिकीकरणाचा परिणाम झाला आहे.ग्रामीण भागातही स्वागत समारंभाचे फॅडपूर्वी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लग्नकार्य उरकल्यावर दुसऱ्या दिवशी स्वागत समारंभासारखा मोठा कार्यक्रम आयोजित केला जात नव्हता. लग्नाच्या पूर्वी हळद लावणे व शालमुंदीचा कार्यक्रम उत्साहात केला जात होता. मात्र आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातीलही वराकडील मंडळी स्वागत समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करीत आहेत. पूर्वी ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास चालणारे धार्मिक कार्यक्रमही आता फार कमी झाले आहेत. काळानुसार कार्यक्रमातही बदल घडून येत आहे.
पानाच्या पत्रावळी झाल्या लुप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 1:04 AM
सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात लग्न समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. शिवाय काही गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाचा शेवट सार्वजनिक सामूहिक भोजनाने केला जात आहे.
ठळक मुद्देग्रामीण भागातही लोण : सार्वजनिक व खासगी भोजनावळीत प्लास्टिक पत्रावळीचा वापर