कंदमुळे महोत्सव व कृषी मेळावा: व्ही. जे. तांबे यांचे प्रतिपादन गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व शेती रताळाच्या पिकासाठी लाभदायक असल्याने येथील रताळाला संपूर्ण विदर्भात चांगली मागणी आहे. रताळावर प्रक्रिया करून वेगवेगळे खाद्य पदार्थ तयार केल्यास रताळाला आजच्या तुलनेत १० पट अधिक किंमत मिळेल. नागरिकांनाही रोजगाराचे अतिरिक्त साधन उपलब्ध होईल, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता कृषी मेळावा व कंदमुळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्ही. जे. तांबे होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रगतशील शेतकरी डॉ. मुनघाटे, अनिल पाटील म्हशाखेत्री, आत्माच्या उपसंचालक प्रिती हिरडकर, प्रतीभा चौधरी, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, लभानतांडा येथील महिला शेतकरी विभा रामटेके, लक्ष्मीराम गुलफो, बाबुराव साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील लभानतांडा येथे जवळपास २० हेक्टरवर रताळांची लागवड केली जाते. मात्र रताळांना योग्य किंमत मिळत नसल्याने येथील शेतकरी हळूहळू रताळांची शेती सोडून देत आहेत. रताळाला चांगली किंमत मिळावी, त्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्र गावातील शेतकऱ्यांना तसेच बचत गटांना उपलब्ध व्हावे व त्याची विक्री व्हावी, या उद्देशाने कंदमुळे महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवादरम्यान रताळापासून बनणारी अनेक खाद्य पदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आली होती. ब्रॅन्डेड कंपन्यांच्या खाद्य पदार्थांच्या तुलनेत स्वत: तयार केलेली खाद्य पदार्थ स्वस्त व चांगली राहतात. ही बाब पटवून देण्यात आली. रताळांमध्ये विटॅमिन, प्रथीने, कॅरोटीन, मॅग्नेशीअम, फॉलिक अॅसीड व पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात राहत असल्याने सदर रताळे आरोग्यवर्धक मानली जातात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीकडे वळावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) योगीता सानप तर आभार अनिल तारू यांनी मानले. यशस्वीतेसाठी विषय विशेषज्ञ डॉ. विक्रम कदम, पुष्पक बोथीकर, ज्ञानेश्वर ताथोड, अनिल तारू, मयूर बेलसरे, दीपक चव्हान, सुनिल थोटे, ज्योती परसुटकर, गजेंद्र मानकर, हितेश राठोड, नेशन टेकाम, प्रमोद भांडेकर, प्रविण नामुर्ते, जितेंद्र कस्तुरे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
रताळांवर प्रक्रिया करायला शिका
By admin | Published: March 19, 2017 1:53 AM