गडचिरोली : जिल्ह्यातल्या कमलापूरच्या हत्ती कॅम्पमधील हत्ती गुजरातमध्ये हलविण्याच्या हालचालींना रोखण्यासाठी आता राज्याचे बहुजन कल्याण आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार अशोक नेते हेसुद्धा मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे ‘हत्ती वाचवा’ ही मोहीम समाजमाध्यमांसह सर्वत्र सुरूच आहे. त्यामुळे राज्य सरकार यात काय हस्तक्षेप करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘लोकमत’ने सर्वप्रथम यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडून हत्तींना रोखण्यासाठी विविध स्तरातून निवेदने, हत्ती वाचवा मोहीम आणि राज्य शासनाकडे सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी या विषयावर बोलताना, कमलापूरमधून हत्ती बाहेर नेलेच जाणार नाही आणि नेण्याचा प्रयत्न झाला तरी तो यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगत यासंदर्भात आपण माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
वन्यजीव विभागाची चुप्पी
विशेष म्हणजे राज्यभर हा विषय आता पेटला असताना राज्याच्या वन्यजीव विभागाचे अधिकारी मात्र चुप्पी साधून आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क करूनही ते कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे आणखीच शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे हत्ती घेऊन जाण्यासाठी वन्यजीव विभागानेच तर पुढाकार घेतलेला नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
ताडोबात सोडा, पण बाहेर जायला नको
आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हत्तींना दुसऱ्या राज्यात हलविण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी या हत्तींचे असणे आवश्यक आहे. कमलापुरातील काही हत्तींना दुसरीकडे न्यायचेच असेल तर ताडोबात न्या; पण दुसऱ्या राज्यात अजिबात जाऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात वनविभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे ते म्हणाले.