आरमोरी/जोगीसाखरा : शिवणी, सायगाव, वघाळा, अतरंजी, पालोरा या गावातील २०० हेक्टर क्षेत्रावरील धान पीक करपले असून या क्षेत्रात तत्काळ पाणी सोडावे, असे निर्देश आ. क्रिष्णा गजबे यांनी इटियाडोह पाटबंधारे विभागाचे अभियंता मेंढे यांना दिले आहेत. इटियाडोह धरणाचे पाणी सुटून एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र शिवणी, सायगाव, वघाळा, अतरंजी, पालोरा या गावातील शेतीकडे जाणाऱ्या कालव्याला पाणीच सोडण्यात आले नाही. दहा दिवसांपूर्वी इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याची शेतकऱ्यांनी भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही या कालव्याला पाणी सोडण्यात आले नाही. महिनाभरापासून पाणी न मिळाल्याने सुमारे २०० हेक्टरवरील धान पीक करपले आहे. तर हजारो हेक्टरवरील धान कोमेजायला लागले आहे. ही बाब शेतकऱ्यांनी आ. क्रिष्णा गजबे यांच्या लक्षात आणून दिली. आमदारांनी इटियाडोह पाटबंधारे विभागावर धडक दिली व कालव्याला पाणी का सोडण्यात आले नाही. याबाबत अभियंता मेंढे यांना जाब विचारला. पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने शेवटपर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याची बाब अभियंत्याच्या लक्षात आणून दिली. स्वत: नियोजन करून व उपस्थित राहून प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल, याची व्यवस्था करावे, असे निर्देश आमदारांनी दिले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भारत बावनथडे, सदानंद कुथे, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, राहूल तितीरमारे, नामदेव सोरते, मनोज मने, बाळा बोरकर, चंद्रभान निंबेकार, हारगुळे आदींसह परिसरातील शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इटियाडोहचे पाणी शिवणी परिसरात सोडा
By admin | Published: October 20, 2015 1:36 AM