गडचिराेली : आरमोरी शहरातील बर्डी टी-पॉइंट जवळील मुख्य वाहतुकीच्या मार्गालगत बांधलेल्या गाढवावर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. दिवस-रात्र वाहनांची वर्दळ राहत असलेल्या रस्त्यालगत बिबट आल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पिराजी रामू पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून जाते-पाटे विक्रीचा व्यवसाय करतात. यासोबतच गाढवे पाळून गावाेगावी त्यांचे दूध विक्री करतात. गेल्या तीन चार दिवसांपासून २० गाढवांचा कळप घेऊन ते आरमोरी येथे आले. आरमोरी बर्डी टी-पॉइंट लगत ब्रह्मपुरी रस्त्यालगत त्यांनी तळ ठाेकला. त्यांनी गाढवाला बांधून ठेवले होते. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास शहरातील बर्डी परिसरात आलेल्या बिबट्याने गाढवाच्या कळपावर हल्ला करून एका बिबट्याला गंभीर जखमी केले. मात्र गाढव ओरडल्याने गाढव मालक झोपेतून जागे झाले व आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली.
हल्ल्यात गाढवाचे दोन्ही कान व मागील भागावर जखम झाली. घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्र सहाय्यक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक पाटील, आनंद साखरे व कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचून पंचनांमा केला. जखमी गाढवावर पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले.