चुरमुरासह किटाळी, डोंगरसावंगी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचे गावकरी सांगतात. यापूर्वी जंगलात चराईसाठी गेलेल्या अनेक गुरांना बिबट्याने ठार केले. मात्र शुक्रवारी बिबट्याने चक्क गावात प्रवेश करून खुशाल पांडुरंग मंगरे यांच्या मालकीच्या गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर झडप घातली. यामध्ये गोठ्यातील तिन्ही शेळ्या ठार मारल्या. त्यापैकी एका शेळीवर बिबट्याने गोठ्यातच ताव मारला. यावरून बिबट्या बराच वेळ गोठ्यात थांबला असावा अशी शक्यता आहे. एका शेळीला गोठ्यातच ठेवून दुसऱ्या शेळीला बिबट्याने नदीच्या दिशेने पळवून नेले. शनिवारी सकाळी शेळीमालक खुशाल मंगरे गोठ्यात गेल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली. या घटनेची माहिती त्यांनी पोरला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला दिली. क्षेत्र साहाय्यक सचिन धात्रक, वनरक्षक एस.जी. लांबकाते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
(बॉक्स)
गोठ्यात लावणार ट्रॅप कॅमेरे
बिबट्याने गावात येऊन गोठ्यातील शेळ्या मारल्याची माहिती परिसरात पसरल्याने पहाटे उठून किंवा सकाळच्या सुमारास शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. याबाबत माहिती विचारली असता पोरल्याचे क्षेत्र साहाय्यक सचिन धात्रक यांनी गोठ्यात ट्रॅपिंग कॅमेरे लावणार असल्याची माहिती दिली. त्या बिबट्याचा बंदोबस्त वनविभाग कसा करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
280821\img_20210828_143750.jpg
बिबट्याने गोठयात ठार केलेली शेळी