ओपन स्पेसमुळे दुर्गंधीत होत आहे वाढ
गडचिरोली : न. प. प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून वॉर्डा-वॉर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षण भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र, या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने तिथे कचरा टाकला जात आहे. दाराला कुलूप नाही. ओपन स्पेस विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे.
जुन्या प्रवाशी निवाऱ्यावर शेडची मागणी
आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक जुने प्रवाशी निवारे आहेत. वादळामुळे अनेक प्रवाशी निवाऱ्यांचे छत उडाले आहे. प्रशासनाने जुन्या प्रवाशी निवाऱ्यांवर नव्याने शेड उभारावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
दूध शीतकरण केंद्र अडगळीत
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. सदर केंद्र मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. मागील काही वर्षांत दुधाळ जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढले असून दूध खरेदी केंद्र व शीतकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.
बाजारातील ग्राहकांची भाजी विक्रेत्यांकडून लूट
गडचिरोली : गडचिरोली येथे रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. मात्र, या बाजारात अनेक विक्रेत्यांकडे असलेल्या वजनकाट्यांमध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून येते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठवडी बाजारात वजनकाटे तपासणीची मोहीम राबवावी.
कोटगूल येथे आयटीआय मंजूर करा
कोरची : कोटगूल येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंजूर करून या भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आयटीआय स्थापन केल्याने बेरोजगारीची समस्या दूर होईल.
शहरातील नाल्यांमध्ये फवारणी करा
अहेरी : येथील अनेक वॉर्डातील नाल्यांचा उपसा करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी वॉर्डात डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले असून अनेक घरी लोक तापाने फणफणत आहेत.
बहुतांश कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन बंद
धानोरा : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, काळाच्या ओघात अनेक कार्यालयांतील मशीन बंद अवस्थेत असून याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे.
सिरोंचातील बंद पथदिवे तत्काळ बदला
सिरोंचा : शहरातील काही वॉर्डातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या भागातील नागरिकांना रात्रीच्या सुमारास आवागमन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे बंद पथदिवे तत्काळ बदलावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुर्गम भागातील भ्रमणध्वनी सेवा ठप्प
एटापल्ली : तालुक्यातील दुर्गम भागातील भ्रमणध्वनी सेवा अनेक दिवसांपासून ठप्प आहे. करोडो रुपये खर्च करून अनेक ठिकाणी बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेचे मनोरे उभारण्यात आले. मात्र, सदर टॉवर रेंज राहत नसल्याने भ्रमणध्वनी सेवा ठप्प झाली आहे.
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा
आलापल्ली : शहरातील अनेक वॉर्डातील नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. उलट काही लोक गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. अशा नागरिकांवर स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
खाद्यपदार्थांची रस्त्यावरच विक्री
देसाईगंज : गावातील अंतर्गत रस्त्यांवर उघड्यावर खुलेआम खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे़. हल्ली उघड्यावर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ दुकानदारांवर कारवाईची मागणी आहे.
एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरूस्त
एटापल्ली : अतिदुर्गम भागांत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले आहेत. या योजनेवर लाखो रूपयांचा खर्च झाला आहे. मात्र सदर खर्च वाया गेला आहे.
वसतिगृहाला पलंग व गादीचा पुरवठा करा
एटापल्ली : जिल्हा परिषदेच्या वतीने समूह निवासी वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहामध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी राहून शिक्षण घेतात. या वसतिगृहास मागील अनेक वर्षांपासून लोखंडी पलंग व गाद्यांचा पुरवठा करण्यात आला नव्हता. जुने पलंग मोळकळीस आल्याने विद्यार्थ्यांना खाली झोपावे लागत होते.