नवरगाव येथे प्रशिक्षण : ३५० वर बेरोजगार व विद्यार्थ्यांची नोंदणी कुरखेडा : श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या रोजगार मार्गदर्शन केंद्र, खादी ग्रामोद्योग विभागीय कार्यालय नागपूर तसेच विज्ञान महाविद्यालय पवनीच्या संयुक्त विद्यमाने दत्तक ग्राम नवरगाव (आंधळी) येथे मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. सदर पाच दिवशीय कार्यशाळेत शेतकरी, बेरोजगार व विद्यार्थ्यांनी मधमाशी पालनाचे धडे घेतले. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. डॉ. बी. एस. रहिले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गोविंदराव मुनघाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून खादी ग्रामोद्योग नागपूर विभागाचे विभागीय संचालक गजभिये, मधमाशी तंत्रज्ञ सजये, प्रा. डॉ.रहिले, प्रा. गेडाम, जगदीश मानकर, रमेश पिल्लारे, उद्धव कवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनी जोडधंदा म्हणून मधमाशी पालन व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन सजये यांनी केले. संचालक गजभिये यांनी खादी ग्रामोद्योगाच्या विविध योजना, त्यासाठी मिळणारे अनुदान, अटी, शर्ती याबाबतची माहिती दिली. प्राचार्य डॉ. मुनघाटे यांनी शेतकरी व बेरोजगारांनी उद्योगी बनावे, असे सांगितले. कार्यशाळेचे आयोजन प्रा. डॉ. दीपक बन्सोड यांनी केले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य पी. एस. खोपे, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. संजय महाजन, प्रा. डॉ. रवींद्र विखार, प्रा. डॉ. हेमंत मेश्राम यांच्यासह गावातील नागरिक, विद्यार्थी व बेरोजगार युवकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी घेतले मधमाशी पालनाचे धडे
By admin | Published: March 18, 2017 2:28 AM